
धक्कादायक! वर्धा अर्बन क्रेडिट सोसायटीत कोट्यवधींचा संशयास्पद कर्जवाटप ‘गोरखधंदा’?
*जनतेच्या पैशांवर स्वतःचे लेआउट्स; जाब विचारणाऱ्यांची सभासदत्वे रद्द; चौकशीची मागणी*
विशेष प्रतिनिधी, वर्धा:
सहकार क्षेत्रातील विश्वासार्हतेला हरताळ फासणारा एक धक्कादायक प्रकार वर्धा जिल्ह्यात समोर आला आहे. ‘वर्धा अर्बन अँड रुरल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ या संस्थेत सामान्य ठेवीदार आणि सभासदांच्या विश्वासाला तडे गेले असून, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर साठवणे यांनी नियमांना केराची टोपली दाखवत कोट्यवधी रुपयांचे कर्जवाटप केल्याचा गंभीर आरोप होत आहे. स्वतःचे आणि नातेवाईकांचे लेआउट डेव्हलप करण्यासाठी जनतेच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचे धक्कादायक चित्र कर्ज प्रकरणांच्या उपलब्ध आराखड्यावरून स्पष्ट होत आहे.
सभासदांच्या नावावर परस्पर कर्ज?
अनेक निष्पाप सभासदांच्या नावाने कर्ज उचलण्यात आल्याचे समोर येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्यांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज दाखवले गेले आहे, त्या मूळ व्यक्तींनाच आपल्याला कर्ज मिळाले असल्याची पुसटशीही कल्पना नाही. कोणाच्या परवानगीने आणि कागदपत्रांच्या आधारे हे कर्ज उचलण्यात आले, हा मोठा संशोधनाचा विषय बनला आहे. जेव्हा जागरूक सभासद या मनमानी कारभाराविरुद्ध जाब विचारतात, तेव्हा कायदेशीर उत्तर देण्याऐवजी संस्थापक अध्यक्ष सुधाकर साठवणे हे स्वतःच्या अधिकारात संबंधितांचे सभासत्वच रद्द करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा संतापजनक आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
बोरगाव मेघे (मुख्य शाखा) मधील ‘विशिष्ट’ कर्ज प्रकरणांचा लेखाजोखा:
संस्थेच्या मुख्य शाखेतून ज्या पद्धतीने नियमबाह्य वाटप झाल्याचे सांगितले जात आहे, त्याचा लेखाजोखा खालीलप्रमाणे आहे:अ.क्र.खातेदार / संस्थेचे नावखाते क्रमांककर्ज मंजुरी दिनांककर्ज रक्कम (रुपये)
१)गिरीराज लँड डेव्हलपमेंट१४४/३६७ १६/०६/२०११२०,१०,०००/- (वीस लाख दहा हजार)
२)जय श्री कृष्ण डेव्हलपमेंट१४४/३६९ २०/०६/२०११२३,००,०००/- (तेवीस लाख)
३)जय श्रीकृष्ण डेव्हलपमेंट१४४/३७० २०/०६/२०१११९,५०,०००/- (एकोणीस लाख पन्नास हजार)
४)सुमन गंगाधरराव गोमासे१४४/३७१२१/०६/२०१११६,००,०००/- (सोळा लाख)
५)राधाकृष्ण लँड डेव्हलपमेंट१४४/३६००९/०५/२०११२३,५०,०००/- (तेवीस लाख पन्नास हजार)
६)खुशाल सागरे (संस्थापकांचे साडूभाऊ)१४०/४२३१/१२/२०१०१६,००,०००/- (सोळा लाख)
७)सुधाकर साठवणे (स्वतः अध्यक्ष)१४०/५१२५/०४/२०११६०,००,०००/- (साठ लाख)
८)राजेश वैद्य (संस्थेचे उपाध्यक्ष यांचे भाऊ)१४०/५४०१/०७/२०१०१०,००,०००/- (दहा लाख)
९)नीता अरविंद वैद्य (कर्मचारी)१४०/५६२१/०४/२०११४०,००,०००/- (चाळीस लाख)
१०)सुधाकर साठोणे (स्वतः अध्यक्ष)१४०/५८१९/०७/२०११५०,००,०००/- (पन्नास लाख)सामान्य ग्राहकांना ‘सिबिल’चे नियम, मग संचालकांना सवलत का?
एखाद्या सामान्य किंवा गरीब माणसाला स्वतःच्या उपजीविकेसाठी किंवा वैयक्तिक कामासाठी अवघे काही हजारांचे कर्ज हवे असल्यास बँक अथवा पतसंस्था त्याचा ‘सिबिल स्कोअर’ (CIBIL), मासिक उत्पन्न, जामीनदार आणि उत्पन्नाचे पुरावे तपासून चकरा मारायला लावतात. मात्र, वर्धा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये अध्यक्ष आणि त्यांच्या मर्जीतील नातेवाईक, कर्मचाऱ्यांवर कोट्यवधी रुपयांची उधळण करताना उत्पन्नाचा कोणताही ताळमेळ वा नियमांचे पालन केले गेले नसल्याचे या आकडेवारीवरून उघड होत आहे. स्वतः अध्यक्षांनीच कोट्यवधींचे कर्ज पदरात पाडून घेतल्याने ही संस्था नक्की जनतेसाठी आहे की अध्यक्षांच्या स्वतःच्या व्यवसायासाठी, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
वरदहस्त कोणाचा? न्यायप्रणाली गप्प का?
अशा उघड गैरव्यवहारांवर सहकार विभाग आणि वरिष्ठ पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही? संशयास्पद कर्ज प्रकरणांची चौकशी रोखण्यामागे जिल्ह्यातील कोणत्या मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त तर नाही ना? अशी शंका आता वर्धेकरांच्या मनात निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकाराची सहकार आयुक्तांमार्फत उच्चस्तरीय चौकशी होऊन पीडित आणि फसवणूक झालेल्या सभासदांना तात्काळ न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.