
तपास राहिला अन हरिद्वार पाहिला!”; सेलू पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांची हरियाणा वारी चर्चेत, गुन्ह्याचा तपास सोडून पर्यटनाचा आनंद
वर्धा:
गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी सरकारी खर्चाने आणि अधिकृत कामासाठी बाहेरगावी गेलेले खाकी वर्दीतील काही कर्मचारी कर्तव्याशी कशी दराडेबाजी करतात, याचे उत्तम उदाहरण वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्यातून समोर आले आहे. एटीएम अदलाबदलीच्या (ATM Swap) एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी हरियाणाला गेलेल्या सेलू पोलीस ठाण्याच्या दोन वसुलीबाज अंमलदारांनी तपासाकडे पाठ फिरवून थेट ‘हरिद्वार’ची सफर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सेलू पोलीस ठाण्याची पुन्हा एकदा नाहक बदनामी होत असून, कर्तबगार ठाणेदारांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करत त्यांची जागा दाखवून दिली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
सेलू पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हा दाखल क्र. ५२६/२०२६, कलम ३१८, ४ आणि ३(५) बीएनएस नुसार एटीएम कार्ड अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्या अझरुद्दीन ताहीर हुसेन या मुख्य आरोपीचा आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी सेलू पोलीस ठाण्याचे पथक हरियाणा राज्यात गेले होते. या पथकात सेलू पोलीस ठाण्याचे अंमलदार अखिलेश गव्हाणे व त्यांचे एक साथीदार समाविष्ट होते.
तपासापेक्षा धार्मिक पर्यटनाला प्राधान्य
आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकणे ही या मोहिमेची मुख्य जबाबदारी होती. मात्र, संबंधित अंमलदारांनी आरोपीच्या माгаवर जाण्याऐवजी आणि कायदेशीर कारवाई करण्याऐवजी आपला मोर्चा हरिद्वारच्या दिशेने वळवला. तपासाचे गांभीर्य बाजूला सारत या दोन्ही कर्मचाऱ्यांनी हरियाणात सरकारी कामाची औपचारिकता पूर्ण करून चक्क ‘हरिद्वार’चा आनंद घेतल्याची चर्चा आता पोलीस वर्तूळात आणि नागरिकांमध्ये रंगली आहे.
ठाणेदारांचा दणका आणि प्रशासकीय कारवाईचा प्रश्न
गुन्ह्याचा तपास करण्याऐवजी अशा प्रकारे मौजमजा व फिरत असल्याचे प्रकार जेव्हा सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्तव्यदक्ष ठाणेदारांच्या कानावर आले, तेव्हा त्यांनी या प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घेतली. वरिष्ठांच्या आदेशाचा आणि कर्तव्याचा असा फज्जा उडवणाऱ्या त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना त्यांनी तात्काळ त्यांच्या ‘योग्य जागेवर’ आणत चांगलीच तंबी दिली आहे.
परंतु, या प्रकारामुळे खाकी वर्दीला लागलेला डाग आणि जनतेचा पोलिसांवरील विश्वास यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्ह्याचा तपास करायला गेलेल्या पथकाने जर असा प्रताप केला, तरसामान्य नागरिकांनी न्याय मागण्यासाठी कुणाकडे जायचे? असा संतप्त सवाल आता सेलू परिसरातील नागरिक विचारत आहेत. त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक महोदय या प्रकरणी गंभीर दखल घेऊन सहलीचा आनंद घेणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या या वसुलीबाज कर्मचाऱ्यांवर काय आणि कधी कठोर कारवाई करणार? याकडे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.