
पावसामुळे सोयाबीन, तूर, कपाशीचे अतोनात नुकसान; आ. राजेश बकाने पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर!
वर्धा:
देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रात पावसाने दीर्घ ताण दिल्यामुळे शेतकऱ्यांची पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. हाताशी आलेले हंगामी पिके हातची जात असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी स्वतः विधानसभा क्षेत्रातील विविध गावांचा दौरा करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.
शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
यंदाच्या हंगामात पावसाच्या अनिश्चिततेमुळे सोयाबीन, तूर आणि कपाशी या प्रमुख पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. सततच्या कोरड्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे आणि पावसाअभावी पिके पिवळी पडून करपू लागली आहेत. यामुळे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असून, “यावर्षी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे,” अशी हतबलता शेतकरी व्यक्त करत आहेत.
आमदारांची प्रत्यक्ष पाहणी व आक्रमक भूमिका
शेतकऱ्यांच्या या दुःखात सहभागी होत आ. राजेश बकाने यांनी तातडीने शेतशिवारात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांनी धीर दिला. तसेच, विधिमंडळात याप्रकरणी आवाज उठवत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी ठाम मागणी सरकारकडे केली आहे.
आमदारांनी दिलेली प्रमुख आश्वगने:
युद्धपातळीवर पंचनामे: प्रशासनाला तात्काळ निर्देश देऊन ८ ऑक्टोबरपर्यंत सर्व नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लवकरच नुकसान भरपाई: पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून लवकरात लवकर योग्य ती आर्थिक मदत व नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
”निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकरी हतबल झाला आहे. या कठीण काळात सरकार आणि प्रशासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुणीही शेतकरी बांधवाने खचून जाऊ नये, प्रत्येकाला हक्काची व न्याय्य भरपाई मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
— आमदार राजेश बकाने,
देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्र
या दौऱ्यादरम्यान स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आमदारांनी स्वतः बांधावर जाऊन घेतलेल्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा धीर निर्माण झाला असून, आता प्रशासनाकडून वेळेत पंचनामे पूर्ण होऊन मदतीची प्रतीक्षा केली जात आहे.