*ईशान चेतन तुपे (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली हडपसरमध्ये आंदोलन; MSIDC व NHAI प्रशासनाला तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी*

पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तीव्र निषेध आंदोलन
ईशान चेतन तुपे (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली हडपसरमध्ये आंदोलन; MSIDC व NHAI प्रशासनाला तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी
पुणे, दि. २० ऑगस्ट २०२६ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर परिसरात रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष ईशान चेतन तुपे (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस व हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज भाजी मंडई परिसरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
पुणे-सोलापूर महामार्ग हा शहरातील आणि परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान तसेच अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी यावेळी ईशान तुपे (पाटील) यांनी केली.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर MSIDC चे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर संतोष बांपलवार यांनी ईशान तुपे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी देण्यात आलेले पत्र प्राप्त झाले असून, रस्त्यावरील दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच आंदोलनस्थळी NHAI चे डेप्युटी इंजिनिअर अतुल सुर्वे आणि MSIDC चे डेप्युटी इंजिनिअर संजीव पाटील यांना निवेदन देण्यात आले. महामार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील चार ते पाच दिवसांत खड्डे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता या आश्वासनाची तातडीने आणि प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे ईशान तुपे यांनी स्पष्ट केले.
“नागरिकांच्या जीविताशी संबंधित असलेल्या रस्त्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. दिलेल्या मुदतीत खड्डे दुरुस्त न झाल्यास नागरिकांच्या हितासाठी पुढील तीव्र आंदोलन करण्यात येईल,” अशी भूमिका यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनास नगरसेवक अजित घुले, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, युवक अध्यक्ष इंद्रसेन काकडे, महिला कार्याध्यक्ष रोहिणी क्षीरसागर, पदवीधर अध्यक्ष राहुल चव्हाण, उपाध्यक्ष अक्षय शेवाळे, दिग्विजय खरात, विठ्ठल विचारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.