वेळ: 12:20 तरी कार्यालयात उपविभागीय अधिकारी नाही

वर्धा पाटबंधारे विभाग वर्धा व पाटबंधारे उपविभाग सेलू- येथील कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांचा अनागोंदी कारभार ऐरणीवर; “अर्धे आम्ही, अर्धे तुम्ही, काम कमी अन् ऑफिसला नाही आले तरी चालेल” अशी कार्यकारी अभियंत्यांची कार्यशैली!
वर्धा:
वर्धा जिल्ह्यातील पाटबंधारे विभाग (सिंचन भवन) आणि सेलू उपविभाग सध्या आपल्या मनमानी व अनागोंदी कारभारासाठी सर्वत्र चर्चेत आला आहे. जिल्ह्यात नीतू चव्हाण या कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाल्यापासून येथील कारभार पूर्णपणे रामभरोसे चालल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे निसर्गाने पावसाची दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असताना, दुसरीकडे सिंचन विभागाचे अधिकारी मात्र आपल्याच मस्तीत मग्न असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रमुख मुद्यांनुसार कारभाराची पोलखोल:
कार्यकारी अभियंत्यांचे नागपूरहून अपडाऊन: कार्यकारी अभियंता नीतू चव्हाण या नागपूरवरून कार्यालयात अपडाऊन करतात. त्या कधीही वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
सेलूचे उपविभागीय अभियंता मोहाडे यांची मनमानी: उपविभाग सेलू येथे कार्यरत असलेले उपविभागीय अभियंता मोहाडे हे आपले खाजगी कार्यालय सांभाळून, वेळ मिळेल तेव्हाच सेलू कार्यालयात फेऱ्या मारतात, अशी चर्चा आहे.
कुणाचाही वचक उरला नाही: वरिष्ठ अधिकाऱ्यांचा किंवा मंत्र्यांचा कोणताही धाक या अधिकाऱ्यांवर उरलेला नाही. मुख्य कार्यकारी अभियंता कार्यालयाकडूनही ठोस कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने या अधिकाऱ्यांना जणू ‘मनमर्दी’ करण्याचे परवानाच मिळाला आहे.
”मूग गिळून गप्प” असणारे धोरण: कार्यकारी अभियंता नीतू चव्हाण यांनी इतर सर्व अधिकाऱ्यांनाही हवी तशी मनमानी करण्याची मोकळी छूट दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे सर्वसामान्यांची व शेतकऱ्यांची कामे रेंगाळली आहेत.
शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न; दाद मागावी कुणाकडे?
सध्याच्या हंगामात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांना सिंचनासाठी पाण्याची गरज असताना सिंचन विभागाचे अधिकारी आपल्याच मुदतीत मग्न आहेत. “पगार पूर्ण घ्यायचा आणि काम मात्र करायचे नाही,” असा संदेश या विभागाकडून दिला जात आहे. “नागरिकांची कामे झाली नाही तरी चालतील,” अशी अनास्था दाखवणाऱ्या या अधिकाऱ्यांवर अखेर कारवाई करणार कोण? असा संतप्त सवाल शेतकरी व नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर शेतकऱ्यांनी बंड पुकारून दाद मागितली तरी कुणाकडे? असा गंभीर प्रश्न आता वर्धा जिल्ह्यात उपस्थित होत असून या भ्रष्ट व आळशी कारभारावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.