
वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व एपीआय संदीप कापडे यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कार प्रदान
वर्धा:
गुन्ह्यांचा तांत्रिक अन्वेषण, भक्कम पुरावे आणि अचूक तपासणीच्या आधारे गुन्हेगारांना न्यायालयाकडून कठोर शिक्षा मिळवून दिल्याबद्दल वर्ध्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि सायबर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे यांना महाराष्ट्र पोलीस दलाचा सन २०२३ मधील ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ (Best Conviction) पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मा. अपर पोलीस महासंचालक (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे) यांच्या हस्ते २५ ऑगस्ट २०२६ रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गंभीर गुन्ह्यात आरोपीला जन्मठेप: एसपी सौरभ कुमार अग्रवाल यांचा गौरव
सन २०१९ मध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ३७६ सह पॉक्सो (POCSO) आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये अत्यंत गंभीर आणि आव्हानात्मक गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन काळातील या गुन्ह्याचा तत्कालीन पोलीस अधिकारी व सध्याचे वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, अचूक पुरावे व साक्षीदारांची भक्कम साखळी मांडून तपास केला.
त्यांच्या या उत्कृष्ट तपासामुळे न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. निष्पक्ष व गतिमान तपास करून पीडितांना न्याय मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या दैदिप्यमान कामगिरीची दखल घेत त्यांना २०२३ या वर्षातील ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्काराने सन्मानित केले.
गांजा तस्करी प्रकरणात भक्कम तपास: एपीआय संदीप कापडे यांचाही सन्मान
तसेच, सध्या वर्धा जिल्हा सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे यांनी चंद्रपूर येथे नियुक्तीदरम्यान रामनगर पोलीस ठाण्यात ५९ किलो गांजा जप्त करून दोन आरोपींवर NDPS कायद्यांतर्गत कारवाई केली होती.
तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने केलेल्या या कटाक्षाने केलेल्या तपासामुळे मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची (आजन्म कारावास) शिक्षा सुनावली. या उत्कृष्ट तपासाची दखल घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे यांनाही २०२३ या वर्षाचा ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.