
शासकीय कामाचा ताण आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे शिक्षिकेचा दुर्दैवी अंत; हिंगणघाट हायवेवर भीषण अपघातात शिक्षिका जागीच ठार
हिंगणघाट / वर्धा:
शासकीय कामांचा वाढता अतिरिक्त ताण आणि प्रशासनाच्या अवाजवी अटींमुळे एका कर्तबगार शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक व संतापजनक घटना हिंगणघाट घ्या राष्ट्रीय महामार्ग 144 कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील पुलावर घडली आहे. उपक्रमांचा सातेफळ येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. जोशना गिरीश नारायणजे (वय – , रा. हिंगणघाट) यांचा मोपेड गाडीने ट्रेनिंगला जात असताना झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी आतापर्यंत पाच ते सहा अपघाताच्या घटना घडल्या असून अनेकांना आतापर्यंत जीव गमवावा लागलाआहे तरी प्रशासन कुंभकरणाच्या निद्रेत आहे या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पावसाचा ऑरेंज अलर्ट असतानाही शिक्षण विभागाने दिले ट्रेनिंगचे बंधन…
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता. असे असतानाही प्रशासनाने शिक्षकांना दुपारी २ वाजेपर्यंत आपली नियमित शाळा पूर्ण करून शासनाने आयोजित केलेल्या एसआयआर (SIR) ट्रेनिंगला उपस्थित राहणे सक्तीचे केले होते. विशेष म्हणजे, हे प्रशिक्षण एखाद्या मोठ्या शहरात वा सोयीच्या ठिकाणी आयोजित न करता चिंचोलीसारख्या ग्रामीण भागात ठेवण्यात आले होते.
हवामानाची प्रतिकूल परिस्थिती आणि मुसळधार पाऊस सुरू असतानाही, ‘वेळेवर हजर राहणे बंधनकारक’ असल्याच्या प्रशासकीय दबावापोटी सौ. जोशना नारायणजे या दुपारी २ वाजता शाळा आटोपून आपल्या मोपेड (दुचाकी) वाहनाने हिंगणघाटवरून चिंचोलीकडे जाण्यासाठी निघाल्या.
हायवेवर काळाचा घाला
हिंगणघाट सोडल्यानंतर हायवेवर मुसळधार पावसात त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की सौ. नारायणजे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
नेमका दोष कोणाचा? कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
सौ. जोशना नारायणजे यांच्या अचानक जाण्याने त्यांचा हसता-खेळता परिवार पूर्णपणे उघड्यावर पडला आहे. “शासनाने आणि शिक्षण विभागाने शिक्षकांच्या पाठीमागे नेमकी कामे द्यावी तरी किती?” असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात निसर्गाचा कोप आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट असतानाही शिक्षकांना सक्तीने प्रवासाला भाग पाडणाऱ्या प्रशासकीय निर्णयावर आता तीव्र ताशेरे ओढले जात आहेत. “हा अपघात नसून प्रशासनाच्या अवाजवी अटी आणि अतिरिक्त कामाच्या ताणामुळे घेतलेला बळी आहे,” असा थेट आरोप मृत शिक्षिकेच्या नातेवाईकांनी व स्थानिक शिक्षकांनी केला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे शिक्षकांवरील बिन-शिक्षण कामांचा ताण आणि आपत्कालीन स्थितीत प्रशासनाकडून होणारी सक्ती पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून, दोषी अधिकाऱ्यांवर आणि नियोजनशून्य कारभारावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.