
वर्ध्यात देहव्यापार अडड्यावर पोलिसांची धाड; पिडीत महिलेची सुटका, पती-पत्नीसह दोघांना अटक
वर्धा:
वर्धा शहरातील कारला रोडवरील वैष्णवी कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या नखाते ले-आउट परिसरात सुरू असलेल्या एका देहव्यापार अडड्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. या धाडीदरम्यान पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली असून, स्वतःच्या फायद्यासाठी देहव्यापार चालवणाऱ्या पती-पत्नीला रंगेहात अटक केली आहे. आरोपींकडून रोख रक्कम आणि मोबाईलसह एकूण ३४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा
पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, रूपा नावाची महिला कारला रोडवरील नखाते ले-आउट येथील आपल्या राहत्या घरी राज्यातील आणि परराज्यातील मुलींना पैशांचे आमिष दाखवून आणते आणि त्यांच्याकडून देहव्यापार करून घेते. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांना अवगत केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार, पोलिसांनी अत्यंत गोपनीयतेने एक बनावट ग्राहक (पंटर) तयार करून त्या पत्त्यावर पाठवला.
धाड टाकून दोघांना अटक, पीडितेची सुटका
बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलीस पथकाने घराची झडती घेतली. यावेळी घरा एका खोलीत बनावट ग्राहक आणि एक पीडित महिला देहव्यापार करताना आढळून आली. पोलिसांनी पीडित महिलेची चौकशी केली असता, ती नागपूर येथील असून तिला पैशांचे आमिष दाखवून येथे बोलावण्यात आल्याचे तिने सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली आहे:
१) रूपा दुर्योधन गव्हाळे (वय ३३ वर्षे)
२) गणेश गोविंद महाले (वय ४३ वर्षे, पती)
दोन्ही रा. नखाते ले-आउट, वैष्णवी कॉम्प्लेक्स जवळ, कारला रोड, वर्धा.
आरोपी रूपा गव्हाळे ही ग्राहकांकडून पैसे घेत असे, तर तिचा पती गणेश महाले हा घराबाहेर राहून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवून देखरेख करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
३४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून:
३ अँड्रॉइड मोबाईल फोन
नगद ४,५०० रुपये
देहव्यापारासाठी लागणारे साहित्य
असा एकूण ३४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पीडित महिलेची सुटका करून तिला वर्धा येथील महिला सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर (वर्धा) येथे कलम १४३(२) भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम ३, ४, ५, ७ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सिनुकुमार बानोत, विजयसिंह गोमलाडू, पोलीस अंमलदार अमर लाखे, संजयसिंग सूर्यवंशी, चंद्रकांत बुरंगे, संजय राठोड, नितेश मेश्राम, अमोल नगरराळे, मंगेश चावरे, नवनाथ मुंडे आणि अलका कुंभलकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली