बोरगाव ग्रामपंचायतीत प्रशासक असतानाही माजी सदस्यांचा ‘मिनिस्टर पॉवर’!

बोरगाव ग्रामपंचायतीत प्रशासक असतानाही माजी सदस्यांचा ‘मिनिस्टर पॉवर’!
कमिशन न मिळाल्याने माजी सदस्याच्या तक्रारीवरून विकासात्मक काम बंद; नागरिकांचा संताप, आंदोलनाचा इशारा
बोरगाव (वर्धा):
वर्धा लगत असलेल्या आणि सध्या प्रशासक राज सुरू असलेल्या बोरगाव ग्रामपंचायतीअंतर्गत सध्या मोठा मनमानी कारभार समोर आला आहे. मेघे परिसराशी जोडलेल्या व गावकऱ्यांच्या हिताच्या विकासात्मक कामांना ग्रामसेवकांच्या माध्यमातून गती दिली जात असताना, एका माजी ग्रामपंचायत सदस्याच्या अरेरावीमुळे आणि कमिशनखोरीच्या हव्यासापोटी सुरू असलेली महत्त्वाची विकासकामे बंद पाडण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कंत्राटदाराने कमिशन न दिल्याने माजी सदस्य नितीन डफडे यांनी पंचायत समितीचे अभियंता साईनाथ भोसले यांच्याकडे तक्रार करून हे काम बंद पाडल्यामुळे संतप्त नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नेमका प्रकार काय?
बोरगाव ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. प्रशासक असतानाही माजी ग्रामपंचायत सदस्यांचा हस्तक्षेप अद्यापही थांबलेला नाही. गावातील रखडलेली आणि अत्यंत गरजेची विकासाची कामे कंत्राटदाराद्वारे सुरू करण्यात आली होती. मात्र, संबंधित कंत्राटदाराने माजी सदस्य नितीन डफडे यांना हव्या असलेल्या ‘कमिशन’ची पूर्तता न केल्यामुळे, वैयक्तिक रोषातून डफडे यांनी थेट पंचायत समिती गाठली. तेथील अभियंता साईनाथ भोसले यांच्याशी सलगी करत त्यांनी या चालू कामावर आक्षेप घेतला आणि काम तात्काळ बंद पाडले.
नागरिकांच्या जीवाशी खेळ, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
माजी सदस्याच्या या संशयास्पद आणि स्वार्थी कारभारामुळे सध्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काम अर्धवट आणि बंद पडल्यामुळे रस्त्यावर खड्डे, माती व साहित्य पसरले असून, अनेक विद्यार्थ्यांना आणि शाळकरी मुलांना ये-जा करताना अपघात होत आहेत. अर्धवट कामामुळे साचलेला कचरा व चिखलामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
“काम बंद केल्यामुळे अनेक विद्यार्थी व नागरिकांना दुखापती झाल्या आहेत. या जखमी नागरिकांच्या उपचाराचा व रुग्णालयाचा खर्च ग्रामपंचायत देणार की तो माजी सदस्य नितीन डफडे देणार?” असा संतप्त सवाल आता बोरगावमधील सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
प्रशासन गप्प का? कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
एका बाजूला प्रशासक असताना माजी सदस्यांचा हा विनाअधिकार ‘मिनिस्टर पॉवर’ चालत असल्यामुळे ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कमिशन न मिळाल्यामुळे जनतेच्या हक्काचे काम रोखून धरणाऱ्या या कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.
नागरिकांनी प्रशासनाला सज्जड चेतावनी दिली आहे की, बंद पडलेले विकासकाम तात्काळ चालू करून नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा बोरगाव परिसरातील नागरिक ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढत तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करतील. जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा भ्रष्ट आणि मनमानी करणाऱ्यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.