
पारशिवनी ग्रामीण रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाकडून महिला पत्रकाराचा विनयभंग व जातीय अपमान; ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी
पारशिवनी / नागपूर:
पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या एका आदिवासी महिला पत्रकाराशी तेथील सुरक्षा रक्षक श्री. चंद्रभान (शेखर) कोलते याने अत्यंत असभ्य वर्तवणूक करून विनयभंग, जातीय अपमान, शिवीगाळ व पोलिसांची दिशाभूल केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. हर्ष पोद्दार यांच्याकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली असून, संबंधित सुरक्षा रक्षकावर ॲट्रॉसिटी कायद्यासह योग्य कलमांन्वये तत्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
घटनाक्रम व मुख्य आरोप:
‘पुढाकार न्यूज २४’ च्या प्रतिनिधी तथा ‘व्हॉईस ऑफ मीडिया (VOM)’ च्या सदस्या श्रीमती निर्मला श्रावण मरकाम (वय ३७ वर्ष, रा. ढवलापूर, ता. पारशिवनी) या २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० ते ११:३० वाजेच्या सुमारास उपचारासाठी पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात गेल्या होत्या. केस पेपर/ओपीडी पावती काढून त्या नियमानुसार रांगेत उभ्या असताना, सुरक्षा रक्षक चंद्रभान कोलते हा आपल्या ओळखीच्या लोकांना रांगेतून पुढे जाऊ देत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत विचारणा केली असता, सुरक्षा रक्षकाने असभ्य व अरेरावीची भाषा वापरून वाद घातला. “तुझे आयडी कार्ड दाखव, तुझ्यासारखे पत्रकार खूप बघितले आहेत” असे म्हणत कागदपत्रे, ओपीडी पावती व मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर ‘दलाल’, ‘भामटी’, ‘पाकीटमार’ अशा अपमानास्पद शब्दांचा वापर करत, आदिवासी समाजाचा उल्लेख करून जातीय स्वरूपाची शिवीगाळ केली व अयोग्य स्पर्श करून विनयभंग केला.
पोलीस यंत्रणेची दिशाभूल केल्याचा आरोप:
आपले गैरवर्तन झाकण्यासाठी सुरक्षा रक्षकाने रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना न देता ११२ वर फोन करून ‘महिला रुग्ण धिंगाणा घालत आहे’ अशी खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी महिला पत्रकाराला रुग्णालयातून आपल्या वाहनातून नेले. या घटनेमुळे मानसिक त्रास व अपमान सहन करावा लागल्याचे सांगत, २२ सप्टेंबर रोजी पारशिवनी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही अद्याप कठोर कारवाई झाली नसल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
तत्काळ कारवाईची मागणी:
रुग्णालयातील उपलब्ध सीसीसीटीव्ही (CCTV) फुटेज, व्हिडिओ व इतर पुराव्यांची निष्पक्ष चौकशी करून सुरक्षा रक्षक चंद्रभान (शेखर) कोलते याच्याविरुद्ध विनयभंग, असभ्य वर्तन आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये (Atrocities Act) गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
या अर्जाच्या प्रती मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य), पालकमंत्री (नागपूर), अनुसूचित जाती-जमाती आयोग, राज्य महिला आयोग व व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षांनाही कारवाईसाठी सादर करण्यात आल्या आहेत.