
प्रेस नोट
‘मंकी बात’ नाटकाने मांडले अस्वस्थ वर्तमान
अध्ययन भारतीच्या ॲग्रो थिएटरची निर्मिती, प्रेक्षकांनी दिली भरभरून दाद
अध्ययन भारती संचालित ॲग्रो थिएटर निर्मित तथा हरिष इथापे दिग्दर्शित ‘मंकी बात’ या नाट्यकलाकृतीने वर्धेकरांना वास्तववादी दर्जेदार कथानकाचा अनुभव दिला. स्थानिक मगन संग्रहालयाच्या सभागृहात या नाटकाचे सादरीकरण झाले. जंगलातील न्याय अर्थात ज्याला आपण जंगलराज म्हणतो, तो चितारल्यावर हे नाटक दुस-या भागात मानवी जगामध्ये लोकशाही कमकुवत होऊन जंगलराज कसा फोफावत चाललाय, याचा पट उलगडतो.
या प्रयोगशील नाटकात फिजिकल थिएटर शैलीचा प्रभावी वापर करण्यात आला. या नाटकाने उपरोध, विनोद आणि प्रतीकात्मकतेच्या माध्यमातून प्रेक्षकांवर तीव्र परिणाम सोडला. ‘मंकी बात’ या शीर्षकाप्रमाणेच नाटकाची सुरुवात जंगलातील माकडांच्या जीवनचक्रातून होते. आपल्या भाषेत ज्याला आपण ‘जंगलराज’ म्हणतो, जिथे ‘बलवान तोच टिकतो’ हा नियम असतो. सत्तासंघर्षाचे रूपक या भागातून उभे करण्यात आले. त्यानंतर ही कथा मानवी जगात प्रवेश करते.
पहिल्या भागात जंगलातील विविध माकडांचे गट एकमेकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसतात. या संघर्षाचा शेवट एका हुकूमशहाच्या उदयाने होतो. तो सर्वांनाच गिळंकृत करतो. हा प्रसंग सत्तेचे केंद्रीकरण आणि अखेरीस सत्ता सर्व काही आपल्या ताब्यात घेते, याचे प्रभावी प्रतीक म्हणून उभा राहतो.
नाटकाच्या दुसऱ्या भागात हीच माकडे मानवी रूप धारण करून समाजात जगताना दिसतात. कथा एका कुटुंबाभोवती फिरते. त्या कुटुंबातील आजोबा हे कारसेवक असतात. त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना पेन्शन मिळण्याचा अधिकार असतो; मात्र त्यांनी केलेले कार्य हे आपले कर्तव्य होते, त्याची आर्थिक किंमत लावता येत नाही, या ठाम भूमिकेमुळे ते पेन्शन स्वीकारण्यास नकार देतात. परंतु त्यांच्या कुटुंबीयांच्या आग्रहाखातर त्यांना अखेरीस पेन्शनसाठी अर्ज करावा लागतो. अर्ज प्रक्रिया, पडताळणी आणि विविध शासकीय टप्प्यांतून जात असताना प्रत्येक स्तरावर लाच म्हणून त्यांच्या मौल्यवान वस्तू त्यांच्याकडून हिरावून घेतल्या जातात. या प्रवासात अखेरीस त्यांची शेपटीसुद्धा निघून जाते. अंतिम पडताळणीच्या वेळी त्यांना सांगितले जाते की, त्यांच्या ओळखपत्रावरील छायाचित्रात शेपटी आहे, पण प्रत्यक्षात ती नसल्यामुळे त्यांची ओळख सिद्ध होत नाही. त्या एका क्षणी त्यांचे अस्तित्वच नाकारले जाते आणि व्यवस्था त्यांना पूर्णपणे अदृश्य करून टाकते.
उपरोध, प्रतीकात्मकता, फार्स आणि अमूर्त नाट्यभाषेच्या सहाय्याने हे नाटक सत्ताकेंद्रित राजकारण, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणा आणि प्रामाणिक व्यक्तीला व्यवस्था कशा प्रकारे हळूहळू गिळंकृत करते, यावर प्रभावीपणे भाष्य करते. या नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
नाटकाची श्रेयनामावली
निर्मिती प्रमुख संहिता इथापे, संकल्पना, दिग्दर्शन हरिष इथापे, संवाद- शाम पेठकर, हरिष इथापे, नेपथ्य किमया पोहाणे, संगीत जैद हसन, गीतरचना प्रतीक बुडूकले, प्रकाश योजना सुहास नगराळे, वेशभूषा मिनल इथापे यांनी केली आहे, तर आकाश पांडे, शरीफ पठाण, अविष्कार ठाकूर, हर्षवर्धन मानेकरी, दीक्षा उजागरे, रसिका मुळे, हास्या हलुले, तेजस ढोबळे, किमया गिरी, प्रगती बांगडकर, संहिता इथापे, चिंदबरम अक्कल, प्रतीक बुडूकले यांनी भूमिका साकारल्या आहेत.
प्रतिक्रिया
‘मंकी बात’ या नाटकाची संकल्पना एका नाट्य कार्यशाळेदरम्यान आकाराला आली. भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेले मूलभूत हक्क हळूहळू कमकुवत होत चालल्याची जाणीव, समाजात वाढत चाललेले धार्मिक वर्चस्व आणि लोकशाही ही केवळ नावापुरतीच उरली आहे का, या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांतून या नाटकाचा जन्म झाला आहे.