
वर्ध्यात ‘नायरा’ डेपो व धाब्यांच्या आडोशाने पेट्रोल-डिझेलची मोठी तस्करी; सावंगी पोलीस व महसूल विभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?
वर्धा:
वर्धा लगत असलेल्या ‘नायरा’ पेट्रोल-डिझेल डेपोच्या परिसरात आणि नायरा ते पुलगाव हायवे दरम्यान सध्या इंधनाची अवैध तस्करी जोमात सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. डेपोच्याच बाजूला असलेल्या ‘श्री धाबा’ आणि त्या ओळीतील इतर ठिकाणांचा वापर करून दररोज हजारो लिटर डिझेल आणि पेट्रोलची काळ्या बाजारात विक्री केली जात आहे. मात्र, या गंभीर प्रकाराकडे सावंगी पोलीस आणि महसूल विभागाने पूर्णपणे डोळेझाक केल्याचे चित्र असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नवे ठाणेदार आले, पण तस्करी थांबली नाही!
सावंगी पोलीस स्टेशनचे नवे ठाणेदार गिरी हे नुकतेच रुजू झाले आहेत. नवीन अधिकारी आल्यामुळे या भागातील अवैध धंद्यांना चाप बसेल, अशी अपेक्षा वर्धाकरांना होती. मात्र, दुर्दैवाने ठाणेदार गिरी यांचाही या इंधन माफियांच्या मुसक्या आवळण्यात वचक उरलेला नाही, असेच सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. पोलिसांच्या या ढिसाळ कारभारामुळे तस्करी करणाऱ्यांचे मनोबल अधिकच वाढले आहे.
अशी चालते तस्करी: केबिनमधील ‘कानाकोपऱ्यातून’ काळाबाजार
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, या संपूर्ण काळ्याबाजाराचे मास्टरमाईंड ‘दोन्ही टँकर ड्रायव्हर भाऊ’ असल्याचे बोलले जात आहे.
टँकर चालवणारे हे चालक डेपोतून इंधन भरून निघाल्यानंतर हायवेवरील धाब्यांच्या आडोशाला टँकर उभे करतात.
टँकरच्या केबिनमध्ये आणि छुप्या कप्प्यांमध्ये अत्यंत चलाखीने (कानाचोरीने) पेट्रोल-डिझेल काढून ठेवले जाते.
त्यानंतर हे चोरीचे इंधन मुख्य मालकांपर्यंत पोहोचवले जाते.
’ते’ खरे मालक कोण? पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
या संपूर्ण रॅकेटमध्ये टँकर ड्रायव्हर हे केवळ समोर दिसणारे मोहरे आहेत, मात्र त्यांच्या पाठीमागे राहून कोट्यवधींची उलाढाल करणारे मुख्य मालक कोण? हे ड्रायव्हर नक्की कोणासाठी काम करत आहेत? याचा शोध घेणे आता गरजेचे झाले आहे. या छुप्या मालकांचा आणि टँकर चालकांचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान आता सावंगी पोलिसांसमोर आहे.
महसूल विभागही गाढ झोपेत!
केवळ पोलीसच नाही, तर शासनाचा महसूल बुडवणाऱ्या या अवैध व्यवसायावर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या महसूल विभागाचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. शासकीय महसुलाची दिवसाढवळ्या लूट होत असताना महसूल विभागाचे अधिकारी कोणतीही ठोस पावले का उचलत नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मागणी: या भागात सातत्याने होणाऱ्या पेट्रोल-डिझेल तस्करीची महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे सखोल चौकशी करावी. या रॅकेटच्या मुळाशी जाऊन मुख्य सुत्रधारांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.