
बापूराव देशमुख इंजिनिअरिंग कॉलेजचे 112 कुटुंब 67 महिन्यापासून पगारापासून वंचित..
वर्धा: जिल्ह्यातील अग्रगण्य व नामांकित शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या बापूराव देशमुख इंजिनिअरिंग कॉलेजमधील ११२ कर्मचाऱ्यांवर गेल्या ६७ महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. थकित वेतनासाठी वारंवार दाद मागूनही न्याय न मिळाल्याने, संतप्त कर्मचाऱ्यांनी संस्थापक समीर सुरेशभाऊ देशमुख यांच्या निवासस्थानासमोर ध्येय धरणे आंदोलन सुरू केले आहे.
न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली
न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देत ३५ महिन्यांचा पगार बाकी ठेवून उर्वरित थकित पगार तात्काळ आणि सुरळीत देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, न्यायालयीन आदेशानंतरही संस्था प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. ६७ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर आले असून मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन गरजा भागवणे पूर्णपणे कठीण झाले आहे.
११२ कुटुंबांचा यक्षप्रश्न: न्याय मिळणार कधी?
एकीकडे तब्बल ११२ कर्मचाऱ्यांचे कुटुंब उपासमारीशी लढा देत आहे, तर दुसरीकडे संस्थेचे मुख्य चालक समीर सुरेशभाऊ देशमुख मात्र या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. हक्काच्या वेतनासाठी कर्मचाऱ्यांना आज थेट संस्थापकांच्या घरासमोर आंदोलनाला बसावे लागत आहे.
”आमच्या मुलांचे शिक्षण थांबले आहे, घरात अन्नाचा कण नाही. न्यायालयाने आदेश देऊनही जर पगार मिळणार नसेल, तर आम्ही दाद कोणाकडे मागायची?” असा उद्विग्न सवाल आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे.
आता या ११२ कुटुंबांना प्रशासकीय पातळीवर आणि लोकप्रतिनिधींकडून तरी न्याय मिळणार की कर्मचाऱ्यांची ही उपासमार अशीच सुरू राहणार, याकडे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.