
देवळी पोलिसांची रेती माफियाविरुद्ध धडाकेबाज कारवाई; ८ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक!
देवळी (जिल्हा वर्धा):
स्थानिक देवळी पोलिसांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळत एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. सोनेगाव बाई ते वायगाव रोडवर अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्याकडून एकूण ८,०७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २१ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे नाकाबंदी
मिळालेल्या माहितीनुसार, देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप कापडे व त्यांच्या पथकातील अंमलदार पोहवा. गणेश बावणे (ब.नं. ६०९), पोशी. पंकज चामचोर (ब.नं. ३६७) आणि पोशी. अनिकेत तळवेकर (ब.नं. ३६४) यांना गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी २१ जून रोजी पहाटे ०५:२० ते ०५:५० वाजताच्या दरम्यान मौजा वायगाव शिवारारातील सोनेगाव बाई ते वायगाव रोडवर सापळा रचून नाकाबंदी केली.
या नाकाबंदी दरम्यान शासनाचा महसूल बुडवून, विनापरवाना अवैध रेतीची (गौण खनिज) चोरटी वाहतूक व साठवणूक करताना दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
आरोपींना अटक व मुद्देमाल जप्त
या धडक कारवाईत पोलिसांनी खालील दोन आरोपींना अटक केली आहे:
१) गौरव अशोकराव गोडे (वय ३० वर्ष, रा. शिरसगाव, ता. देवळी, जि. वर्धा)
२) प्रज्वल कवडुजी कोहळे (वय २१ वर्ष, रा. सोनेगाव बाई, ता. देवळी, जि. वर्धा)
या दोन्ही आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी विनापरवाना रेतीसह एकूण ८,०७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विविध कलमान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपींविरुद्ध देवळी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ४४४/२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५), ४८(८) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम १८१, १३०, १७७ मोवाका (MVA) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई वर्धा जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल (भापोसे), माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले (उपविभाग पुलगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवाल्दार गणेश बावणे करत आहेत.