अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी कायदा करा; अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन!
हिंगणघाट येथे सकल मातंग चर्मकार समाजातर्फे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

58 राबवंचीत अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याच्या बाजूला धरून हिंगणघाट येथे भव्य मोर्चा
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी कायदा करा; अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन!
हिंगणघाट येथे सकल मातंग चर्मकार समाजातर्फे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
अनुसूचित जाती (SC) आरक्षणाचे उपवर्गीकरण करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी सकल मातंग समाज, चर्मकार समाज यांच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे हिंगणघाट तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. राज्य शासनाने या शैक्षणिक सत्रापासूनच उपवर्गीकरणाची अंमलबजावणी न केल्यास राज्यभरात तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ
निवेदनात नमूद केल्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी ‘दाविंदर सिंग विरुद्ध पंजाब सरकार’ या खटल्याचा ऐतिहासिक निकाल देताना अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयाला अनुसरून पंजाब, हरियाणा, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी आरक्षणाचे उपवर्गीकरण करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.
महाराष्ट्रात अंमलबजावणीस विलंब का?
इतर अनेक राज्यांमध्ये उपवर्गीकरण लागू झाले असताना, पुरोगामी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यात मात्र अद्यापही या प्रक्रियेची सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मातंग समाज आणि इतर तत्सम लाभवंचित घटकांवर मोठा अन्याय होत असून समाजात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे.
प्रमुख मागण्या:
आगामी पावसाळी अधिवेशनात अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा कायदा मंजूर करण्यात यावा.
चालू शैक्षणिक सत्रापासूनच या उपवर्गीकरणाची राज्यात तात्काळ अंमलबजावणी सुरू करून वंचित घटकांना न्याय द्यावा.
शासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा:
राज्य शासनाने या गंभीर विषयावर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास ‘सकल मातंग समाज’ संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.