मंगेश चोरेचा ‘हॉस्पिटल प्लॅन’; पोलिसांच्या तपासात OPD कागदपत्रांचे सत्य उघड

25 गंभीर गुन्ह्यांचा आरोपी मंगेश चोरे पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी रुग्णालयाच्या कागदपत्रांचा घेतोय आधार; मुंबईत पोलिसांचे पथक दाखल
वर्धा:
वर्धा जिल्ह्यात दाखल असलेल्या तब्बल 25 गंभीर गुन्ह्यांमुळे पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेला कुख्यात आरोपी मंगेश चोरे याने पोलिसांच्या जाळ्यातून सुटण्यासाठी एक नवीन शक्कल लढवली आहे. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी हा आरोपी आता रुग्णालयाच्या खोट्या किंवा बनावट कागदपत्रांचा सहारा घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नक्की काय घडले?
पोलिसांचा सापळा: मंगेश चोरे याच्यावर वर्धा जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याला जेस करण्यासाठी पोलिसांनी नुकताच एक मोठा सापळा रचला होता.
बेपत्ता आणि सोशल मीडियाचा वापर: पोलिसांची चाहूल लागताच हा आरोपी वर्धा जिल्ह्यातून कोळवाडी परिसरातून अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर त्याने थेट सोशल मीडियावर मुंबईच्या एका नामांकित रुग्णालयाचे ओपीडी (OPD) कागदपत्र अपलोड केले.
दिशाभूल करण्याचा प्रयत्न: “माझे लिव्हर खराब झाले असून माझे मोठे ऑपरेशन आहे,” असा कांगावा करत त्याने वर्धा जिल्ह्यातील नागरिकांची आणि प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांच्या तपासात बिंग फुटले
आरोपीच्या या दाव्यावर संशय आल्याने गुप्त सूत्रांनी संबंधित मुंबईतील रुग्णालयात प्रत्यक्ष चौकशी केली. या चौकशीत अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली. आरोपी मंगेश चोरे हा उपचारासाठी किंवा भरती होण्यासाठी रुग्णालयात गेलाच नसून, तो केवळ एकदा ओपीडी तपासणीसाठी (OPD Check-up) आला असल्याचे उघड झाले. गंभीर आजाराचा बनाव रचून तो पोलिसांच्या अटकेपासून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याचे याद्वारे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना
हा सातत्याने खंडणी वसूल करणारा आणि नागरिकांची फसवणूक करणारा आरोपी कायद्याच्या हातातून निसटण्यासाठी अशा प्रकारे प्रशासनाची सातत्याने दिशाभूल करत आहे. मात्र, पोलिसांच्या गुप्त यंत्रणेने त्याचा हा डाव उधळून लावला आहे.
मिळालेल्या खात्रीशीर सूत्रांनुसार, या खंडणीबहाद्दर आरोपीला जेरबंद करण्यासाठी वर्धा पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहे. त्यामुळे आता हा कुख्यात आरोपी मंगेश चोरे लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.