शेतकऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न, रस्ते वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदन

विलायती बाभळीच्या निर्मूलनासाठी आमदार राजेश बकाने यांचा पुढाकार
शेतकऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न, रस्ते वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदन
देवळी : देवळी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात वनविभागाच्या विविध जागांवर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या विलायती बाभळीच्या समस्येकडे आमदार राजेश बकाने यांनी गांभीर्याने लक्ष वेधले आहे. शेतकरी व पशुपालकांना भेडसावणाऱ्या चाऱ्याच्या प्रश्नासोबतच ग्रामीण रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या या झाडांमुळे होणारे वाहतुकीचे अडथळे लक्षात घेता, विलायती बाभळीचे टप्प्याटप्प्याने निर्मूलन करून त्या ठिकाणी देशी वृक्षप्रजातींचे वनीकरण करण्याची मागणी त्यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री मा. ना. श्री. गणेशजी नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देवळी विधानसभा मतदारसंघातील अनेक ग्रामीण भागात विलायती बाभूळ (Prosopis juliflora) मोठ्या प्रमाणात पसरली आहे. ही परदेशी व आक्रमक वृक्षप्रजाती असल्याने तिच्या अनियंत्रित वाढीमुळे स्थानिक गवत, वनस्पती आणि जैवविविधतेवर परिणाम होत आहे. विशेषतः गावालगत तसेच वनविभागाच्या जागांवर या झाडांचा वाढता विस्तार झाल्याने गुरांसाठी उपलब्ध असलेले नैसर्गिक चाऱ्याचे क्षेत्र कमी होत असल्याची समस्या शेतकरी आणि पशुपालकांकडून सातत्याने मांडली जात आहे.
“शेतकऱ्याच्या जनावरांसाठी चारा ही केवळ पर्यावरणाची बाब नसून त्याच्या कुटुंबाच्या अर्थकारणाशी जोडलेली गरज आहे,” या भूमिकेतून आमदार बकाने यांनी हा प्रश्न मांडला आहे. विलायती बाभळीमुळे स्थानिक गवत आणि चाऱ्याची उपलब्धता कमी होत असल्याने पशुपालकांना बाहेरून चारा आणण्याचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागतो. त्यामुळे या समस्येकडे केवळ वनसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून न पाहता शेतकरी आणि पशुपालकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न म्हणून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनातून स्पष्ट केले.
रस्ते वाहतुकीलाही अडथळा
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कडेला आणि काही ठिकाणी रस्त्याच्या हद्दीलगत वाढलेल्या विलायती बाभळीमुळे वाहनचालकांना अडचणी निर्माण होत आहेत. झाडांच्या फांद्या रस्त्यावर येत असल्याने वाहनांच्या सुरक्षित वाहतुकीवर परिणाम होतो. विशेषतः रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेण्यात अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढतो. शेतीमालाची वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांची ये-जा तसेच गावांदरम्यानची नियमित वाहतूक यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे शेतकऱ्यांना चारा, पर्यावरणाचे संरक्षण आणि ग्रामीण रस्त्यांची सुरक्षित वाहतूक या तिन्ही बाबींचा समन्वय साधत वनविभागाच्या जागांवरील विलायती बाभळीचे नियोजनबद्ध पद्धतीने निर्मूलन करण्याची मागणी आमदार बकाने यांनी केली आहे.
देशी वृक्षांचे वनीकरण करण्याची मागणी
विलायती बाभळीचे निर्मूलन केल्यानंतर त्या जागा पुन्हा अशाच प्रकारच्या आक्रमक वनस्पतींच्या ताब्यात जाऊ नयेत, यासाठी स्थानिक हवामान, माती आणि पर्यावरणाला अनुरूप मूळ भारतीय देशी वृक्षप्रजातींची लागवड करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यामुळे स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन होण्यासोबतच भविष्यात ग्रामीण भागातील पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होईल. तसेच स्थानिक गवत व चाऱ्याच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन शेतकरी व पशुपालकांना त्याचा फायदा होऊ शकतो.
वनविभागाला विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश द्यावेत
या समस्येवर केवळ तात्पुरती उपाययोजना न करता वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देऊन विलायती बाभळीच्या निर्मूलनासाठी टप्प्याटप्प्याने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी आमदार राजेश बकाने यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या रोजच्या अडचणी, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता आणि ग्रामीण भागातील सुरक्षित वाहतूक यासारखे प्रश्न प्रत्यक्ष गावपातळीवर समजून घेऊन त्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका आमदार बकाने यांनी घेतली आहे. त्यामुळे शेतकरी, पशुपालक आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांसाठी उभा राहणारा आमदार अशी त्यांची भूमिका या निवेदनातून पुन्हा अधोरेखित झाली आहे.