
वर्धा शहरालगतच्या नेरी पुनर्वसन परिसरात सुरू आहे अवैध बनावट फिनाइलचा कारखाना; प्रशासनाचे दुर्लक्ष
वर्धा:
वर्धा शहरलगत असलेल्या संवेदनशील व दाट लोकवस्तीच्या नेरी पुनर्वसन परिसरामध्ये एका मोठ्या घरात कसल्याही अधिकृत परवानग्याशिवाय आणि ट्रेडमार्कशिवाय मोठ्या प्रमाणावर अवैध व बनावट फिनाइलचा कारखाना सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा सारा प्रकार स्मशानभूमीच्या लगत असलेल्या एका भल्यामोठ्या घरात गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असून, याठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, नामांकित कंपनीचे उत्पादन असल्याचा दावा करून या ठिकाणी बनावट फिनाइलची निर्मिती व पॅकिंग केले जाते. मात्र, हे फिनाइल नेमके कशापासून बनवले जाते, त्याचे फॉर्म्युलेशन काय आहे आणि याला कोणता ट्रेडमार्क किंवा परवाना आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आरोग्य विभाग आणि स्थानिक पोलीस या दोघांच्याही डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
या परिसरामध्ये केवळ अवैध फिनाइलच नव्हे, तर इतरही अनेक संशयास्पद आणि बेकायदेशीर गतिविधियोंना खतपाणी घातले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
शहराच्या अगदी जवळ आणि स्मशानभूमीसारख्या सार्वजनिक जागेच्या लगत असे अनधिकृत रासायनिक उत्पादन चालत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यार गंभीर धोका निर्माण झाला आहे.
बनावट रासायनिक पदार्थांच्या वापरामुळे आणि विल्हेवाटीच्या अयोग्य पद्धतीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
हा अवैध व्यवसाय नेमका कोणाचा आहे? यामागे कोणाचे हात आहेत? आणि अन्न व औषध प्रशासन (FDA), आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासन या गंभीर प्रकरणाची कधी गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करणार का? असा संतप्त सवाल आता नेरी पुनर्वसन परिसरातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तात्काळ या घरावर धाड टाकून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.