ठाणेदार संदीप कापडे यांची मोठी कारवाई

देवळी पोलिसांची मोठी कारवाई: कडाळूच्या ढिगाऱ्यात लपवलेला १ लाखांहून अधिकचा देशी दारूचा साठा जप्त; एकाला अटक
ठाणेदार संदीप कापडे यांची मोठी कारवाई
देवळी (वर्धा): अवैध धंद्यांविरुद्ध देवळी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, चिंचाळा व अडेगाव शिवारात सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीच्या अड्ड्यावर छापा टाकून १ लाख २ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ६० वर्षीय वृद्धाला अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधारांसह इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
गुरांच्या चाऱ्यात (कडाळू) लपवून ठेवली होती दारू
दिनांक २२ जून २०२६ रोजी देवळी पोलीस स्टेशनचे पो.हवा. गणेश बावणे यांना मुखबिराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, अडेगाव येथील रहिवासी सौ. सुवर्णा सिडाम ही तिच्या साथीदारांसह मौजा चिंचाळा आणि अडेगाव शिवारात अवैध देशी दारूची विक्री करत आहे.
या माहितीच्या आधारे ठाणेदार श्री. संदीप कापडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी अडेगाव ते गौळ मार्गावर नाकेबंदी केली. यादरम्यान जयदेव बापुराव डुकरे (वय ६० वर्ष, रा. चिंचाळा, ता. देवळी) हा संशयास्पद रितीने पोलिसांना मिळून आला. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने धक्कादायक खुलासा केला. आपण सुवर्णा सिडाम व लक्ष्मण मारोतराव सिडाम यांच्या मालकीची देशी दारू विकत असून, उरलेला साठा रविंद्र दौलतकार यांच्या शेतात गुरांच्या खाद्यासाठी (हिरवे कडाळू) लपवून ठेवल्याची कबुली त्याने दिली.
पोलिसांनी तत्काळ रविंद्र दौलतकार यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता, कडाळूच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवलेले १२ खरड्याचे खोके आढळून आले. यात ‘गोवा संत्रा नं. १’ कंपनीच्या १८० एम.एल.च्या एकूण ५११ देशी दारूच्या शिशा (प्रति शिशी किंमत २०० रुपये) असा एकूण १,०२,२०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
मुख्य आरोपींचा शोध सुरू
अटक करण्यात आलेला आरोपी जयदेव बापुराव डुकरे याला न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी (PCR) मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुवर्णा सिडाम, लक्ष्मण सिडाम आणि शेतमालक यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले मॅडम यांच्या निर्देशाप्रमाणे, ठाणेदार संदीप कापडे यांच्या मार्गदर्शनात खालील पथकाने केली:
पोलीस उपनिरीक्षक (PSI): अश्विन गजबिये
पोलीस हवादार: गणेश बावणे (ब.क्र. ९०६)
पोलीस हवादार: गजानन महाकाळकर (ब.क्र. ८८०)
पोलीस शिपाई: अमित पटले (ब.क्र. १२५)
पोलीस कर्मचारी: सतीश दरवरे, दुर्गेश बानते, फिरोज पठाण.