
वडगाव कला येथे रोड कामावरील वाहनांतून डिझेलची सर्रास चोरी; कंपनी व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष?
वडगाव कला:
येथे सध्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या वतीने रस्ता सुधारण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, या कामाच्या आड एक मोठी काळी बाजू समोर येत असून, कंपनीच्या यंत्रसामग्रीतून दररोज हजारो लिटर डिझेलची सर्रास चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. विशेष म्हणजे याकडे कंपनीचे जबाबदार अधिकारी आणि स्थानिक प्रशासन पूर्णपणे डोळेझाक करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
यंत्रसामग्री ठरतेय ‘टार्गेट’
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव कला परिसरातील या रस्त्याच्या कामावर तैनात असलेले टिप्पर, डिझेल टँकर, तसेच पोकलेन मशीन यांसारख्या अवजड यंत्रसामग्रीमधून दररोज मोठ्या प्रमाणावर डिझेल चोरले जात आहे. ही चोरी काही लिटर पुरती मर्यादित नसून, दररोज हजारो लिटर डिझेल लंपास केले जात असल्याचे बोलले जात आहे.
सुमो गोल्ड गाडीचा वापर; संशयितांची नावे चर्चेत
या डिझेल तस्करीसाठी एका विशिष्ट वाहनाचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. सेलू येथील संशयित वाघमारे व सागर डोंबरे हे दोघे त्यांच्या ‘सुमो गोल्ड’ MH- 31 DV -6101या गाडीने थेट घटनास्थळावरून डिझेल चोरून त्याची वाहतूक करत असल्याचे समजते. भरदिवसा आणि रात्रीच्या वेळीही या गाडीद्वारे डिझेलची अवैध ने-आण सुरू असल्याचा आरोप स्थानिक पातळीवर केला जात आहे.
प्रशासनाचा वचक संपला का?
एवढ्या मोठ्या प्रमाणावर डिझेलची खुलेआम चोरी होत असताना ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे अधिकारी गप्प का आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ही चोरी कंपनीच्या अंतर्गत संगनमताने सुरू आहे की बाहेरील घटकांचा याला पाठिंबा आहे, याबाबत संभ्रम आहे. दुसरीकडे, महसूल आणि पोलीस प्रशासनाचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने सामान्य नागरिक आणि कंपनीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
या बेधडक डिझेल चोरीवर संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासन कधी वचक लावणार आणि या रॅकेटचा पर्दाफाश करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.