
ग्राहकांना वेठीस धरणारी ‘सराफ इंडियन गॅस एजन्सी’ अजून सील का नाही? पुरवठा विभागातील ‘बड्या’ अधिकाऱ्याचे एजन्सीधारकाला अभय?
असंख्य ग्राहकांना नाहक त्रास; कारवाईत खोडा घालणारे सहाय्यक पुरवठा अधिकारी साबळे संशयाच्या भोवऱ्यात!
वर्धा:
वर्धा शहरात ग्राहकांशी उर्मटपणे वागणाऱ्या आणि त्यांना अत्यंत त्रास देणाऱ्या ‘सराफ इंडियन गॅस एजन्सी’ विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या एजन्सीच्या मनमानी कारभाराच्या अनेक तक्रारी तालुका पुरवठा निरीक्षकांकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत पुरवठा निरीक्षकांनी कारवाईचा बडगा उभारला खरा, मात्र या संपूर्ण कारवाईत खोडा घालण्याचे काम स्वतः पुरवठा विभागातीलच काही अधिकारी करत असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, सहाय्यक पुरवठा अधिकारी साबळे हे या उर्मट एजन्सीधारकाला पाठीशी घालून, त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या समोर येत आहे.
अधिकाऱ्यांसोबत ‘उर्मट’ एजन्सीधारकाचे सलोख्याचे संबंध का?
ज्या एजन्सीधारकाने वर्धा शहरातील असंख्य गॅस ग्राहकांना नाहक त्रास दिला, गॅस वितरणात अनियमितता केली, त्या एजन्सीधारकावर कारवाई करण्यास प्रशासन दिरंगाई का करत आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, चौकशी आणि कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांशी देखील अत्यंत उर्मट आणि उद्धट भाषेचा वापर करणाऱ्या या एजन्सीधारकाला अभय कोणाचे? सहाय्यक पुरवठा अधिकारी साबळे यांचे या वादग्रस्त एजन्सीधारकासोबत नेमके कोणते सलोख्याचे आणि आर्थिक हितसंबंध आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात आहे, अशी जाहीर चर्चा आता वर्धेकरांमध्ये सुरू झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी
ग्राहकांचे शोषण करणाऱ्या आणि शासकीय नियमांना हरताळ फासणाऱ्या अशा उर्मट व्यक्तीची गॅस एजन्सी तात्काळ सील का केली जात नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुरवठा विभागातील अंतर्गत अभयामुळेच या एजन्सीचे धाडस वाढले असून, आता या प्रकरणात थेट जिल्हाधिकारी महोदयांनीच तात्काळ लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून, ग्राहकांचा छळ करणारी ही एजन्सी लवकरात लवकर सील करावी आणि एजन्सीधारकाला पाठीशी घालणारे सहाय्यक पुरवठा अधिकारी साबळे यांच्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी मागणी वर्ध्यातील त्रस्त नागरिकांकडून जोर धरत आहे