सेलू तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ. शकुंतला पराजे..

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे अश्रू पुसणार; ‘तामसवाडा पॅटर्न’ संपूर्ण वर्धा जिल्ह्यात राबवणार
- वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचे निर्देश
- सेलू तालुक्यातील जंंगलापूर येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाची घेतली भेट; प्रशासकीय यंत्रणेची आढावा बैठक संपन्न
सेलू (प्रतिनिधी): वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य (राज्यमंत्री दर्जा) चे अध्यक्ष मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी आज, १८ जून २०२६ रोजी सेलू तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तालुक्यातील जंगलापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कै. गणेश तुकाराम माहरे यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली व त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला.
ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी कै. गणेश माहरे यांचे वडील श्री. तुकाराम मारोतराव माहरे यांच्याशी चर्चा करून, त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळाले किंवा नाही, याबाबत सविस्तर विचारणा केली. तसेच कुटुंबातील मुलांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या संकटग्रस्त कुटुंबाला शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा तातडीने लाभ मिळवून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
’तामसवाडा पॅटर्न’ संपूर्ण जिल्ह्यात राबवणार; तहसील कार्यालयात आढावा बैठक
आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या भेटीनंतर ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सेलू येथील तहसील कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शासनाच्या सर्व योजना थेट शेवटच्या घटकांपर्यंत आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत प्रभावी ठरलेला ‘तामसवाडा पॅटर्न’ संपूर्ण वर्धा जिल्ह्यात तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
बैठकीतील महत्त्वाचे निर्देश आणि निर्णय:
सावकारी विरोधात मोहीम: अवैध सावकारीबाबत लोकांमध्ये जनजागृती करावी. प्रशासनाने स्वतःहून पुढाकार घेऊन सावकारी छळाबाबत अधिकाधिक तक्रारी दाखल करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावे.
कृषी विभागाला सूचना: शेतकऱ्यांना बी-बियाणे, शेती उपयोगी साहित्य, आणि खतांचे वेळेत वाटप व्हावे. तसेच शासकीय जमिनीवर चारा लागवड करण्यासाठी कृषी विभागाने तातडीने पावले उचलावीत.
दुग्ध व्यवसायाला चालना: शेतकऱ्यांना पूरक उद्योग म्हणून दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी दुग्ध जनावरांचे वाटप करण्याच्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात व त्यांना योग्य मार्गदर्शन करावे.
कौशल्य विकास: आत्महत्याग्रस्त कुटुंबांना स्वावलंबी बनवण्यासाठी ‘कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत’ विशेष भर देण्यात यावा. बँक ऑफ इंडियामार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत या कुटुंबातील सदस्यांना प्रशिक्षित करण्याचे नियोजन करावे.
महिला व बालविकास: आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना ‘बालसंगोपन योजना’ व आर्थिक शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा.
डी.बी.टी. पोर्टल: शासनाच्या सर्व विभागांनी ‘डी.बी.टी. (DBT) पोर्टल’चा व्यापक प्रसार व प्रचार करावा, जेणेकरून अनुदानाचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला सेलूच्या तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विजय कामडी, गटविकास अधिकारी श्री. देवानंद पानबुडे, तालुका कृषी अधिकारी श्री. माहुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राम वरठी, महिला व बालविकास अधिकारी व्हि. जी. नागोसे, गट शिक्षण अधिकारी श्रीमती शैलजा शिंदे उपस्थित होते.
तसेच बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक गौरव गावंडे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एम. डी. साखरे, नायब तहसीलदार श्री. के. डी. किरसान, मंडळ अधिकारी श्री. रमेश भोले, श्री. यशवंत लडके, सचिन पिसुद्दे आणि संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी श्री. भट व कु. ईशा करोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेतकरी कुटुंबांना मिळाला आधार
राज्यमंत्री दर्जा लाभलेले वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष मा. ॲड. निलेश हेलोंडे पाटील स्वतः आपल्या दारी आल्यामुळे आणि प्रशासनाला कडक निर्देश दिल्यामुळे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आपले प्रश्न थेट मांडण्याची संधी मिळाली. या भेटीबद्दल आणि संवेदनशील भूमिकेबद्दल शेतकरी कुटुंबाने प्रशासकीय यंत्रणेचे व अध्यक्षांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.