
वर्धा शहर पोलिसांची मोठी कारवाई : एमडी ड्रग्जसह एक आरोपी अटकेत
वर्धा, दि. 20 जून 2026 : वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवैधरित्या एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक करून मोठी कारवाई केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आनंदनगर परिसरातील रहिवासी शेख अमीर शेख हमीद याच्याकडे एमडी अमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने हा अमली पदार्थ आनंदनगर येथीलच एका व्यक्तीकडून विक्रीसाठी घेतल्याची माहिती दिली.
पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांना नाईट पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीनंतर पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ईदगाह मैदान परिसरात कारवाई केली. तपासणीदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत 3.87 ग्रॅम एमडी अमली पदार्थ, 1,900 रुपये रोख रक्कम आणि दोन अँड्रॉइड मोबाईल फोन असा एकूण 51,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
या कारवाईमुळे शहर परिसरातील एमडी अमली पदार्थांच्या विक्रीवर आळा बसण्यास मदत होणार असून, अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
“वर्धा शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एमडी ड्रग्जसह एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून 51 हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.”