
कायद्याचा धाक आणि जनतेचा विश्वास, वर्धा शहर पोलिसांचा वाढता दबदबा
अवैध धंद्यांवर कारवाई, गुन्हे उघडकीस आणण्यात यश; शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेची सर्वत्र चर्चा
वर्धा
वर्धा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि त्यांच्या पथकाने गेल्या काही महिन्यांत केलेल्या प्रभावी कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अधिक मजबूत झाली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक निर्माण करत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या वर्धा शहर पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. अवैध दारू विक्री, जुगार अड्डे, अवैध व्यवसाय, वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच व समाजकंटकांविरोधात सातत्याने मोहिमा राबविण्यात आल्या. यामुळे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तींच्या हालचालींना आळा बसला असून शहरात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या गस्तीत वाढ, संशयितांवर बारकाईने लक्ष आणि गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई यामुळे पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे. शहरातील नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी पोलीस ठाण्यात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा आणि त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत यासाठी ठाणेदार स्वतः लक्ष घालत असल्याचे नागरिक सांगतात. महिला सुरक्षा, शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, सायबर गुन्ह्यांविषयी मार्गदर्शन आणि वाहतूक शिस्तीबाबतही पोलिसांनी उल्लेखनीय काम केले आहे.
वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या कामगिरीमुळे अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले असून गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले आहे. त्यामुळे कायद्याचे राज्य अधिक बळकट झाले असून नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढला आहे. काही स्तरांतून आरोप-प्रत्यारोप होत असले तरी वर्धा शहर पोलिसांची प्रत्यक्ष कामगिरी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी घेतलेले परिश्रम हेच त्यांचे खरे उत्तर असल्याची भावना शहरातील विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वर्धा शहर पोलीस ठाण्याची यंत्रणा अहोरात्र कार्यरत असून भविष्यातही ते गुन्हेगारीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहेय.