
सिंधी रेल्वे येथील ‘श्रीजी गॅस एजन्सी’कडून ग्राहकांची लूट; जादा दराने सिलिंडर विक्रीचा ‘गोरखधंदा’ उघड
केळझर/सिंधी रेल्वे:
शासकीय नियमांची पायमल्ली करत ग्राहकांची आर्थिक लूट करणाऱ्या गॅस एजन्सीचा मनमानी कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. सिंधी रेल्वे येथील श्रीजी गॅस एजन्सीचे मालक पालीवाल यांच्याकडून गॅस सिलिंडरसाठी निर्धारित किमतीपेक्षा अधिक पैसे उकळले जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून, यामुळे केळझर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीजी गॅस एजन्सीची गाडी सिंधी रेल्वे आणि केळझर परिसरातील एका चौकात उभी करून ग्राहकांना सिलिंडरचे वाटप केले जाते. नियमानुसार गॅस सिलिंडरची अधिकृत किंमत ९६४ रुपये असताना, ग्राहकांकडून मात्र सर्रास ९९५ ते १००० रुपये वसूल केले जात आहेत. विशेष म्हणजे, ग्राहकांना ९६४ रुपयांची पावती दिली जाते, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या खिशातून जादा रक्कम काढून घेतली जात आहे.
’होम डिलिव्हरी’ नाही, तरीही वसुली सुरूच!
ग्राहकांनी विचारणा केली असता, धक्कादायक वास्तव समोर आले. “आम्हाला कोणतीही घरपोच सेवा (Home Delivery) मिळत नाही. आम्हाला स्वतः गाडीपर्यंत येऊन सिलिंडर न्यावा लागतो, तरीही आमच्याकडून १ हजार रुपये घेतले जातात,” अशी कैफियत स्थानिक ग्राहकांनी मांडली आहे. गॅस एजन्सी धारक पालीवाल हे कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसून, अत्यंत मुजोरीने ही लूट सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
लाखो रुपयांचा गैरव्यवहार?
एका सिलिंडरमागे ३० ते ३५ रुपये जादा घेऊन आत्तापर्यंत हजारो ग्राहकांकडून लाखो रुपये लाटले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हा लूटमार करण्याचा परवानाच जणू या एजन्सीला मिळाला आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
कारवाईकडे केळझरवासीयांचे लक्ष
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या केळझरवासीयांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणी खालील मागण्या जोर धरत आहेत:
एचपी गॅस एजन्सीचा परवाना तातडीने रद्द करावा.
ग्राहकांची लूट करणाऱ्या मालकावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.
या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
मुख्य संपादक स्काय न्यूज लाईव्ह निलेश पिंजरकर
