
वर्धा:
आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक आणि प्रखर हिंदूवादी नेते डॉ. प्रवीण तोगडिया सध्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान गिरड येथील श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टचे सचिव संदीप शिवनकर यांनी त्यांची भेट घेऊन गिरड येथील महत्त्वपूर्ण धार्मिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी विशेषतः ‘शिवटेकडी’ या नावावरून सुरू असलेल्या वादावर डॉ. तोगडिया यांनी कडक भूमिका मांडली.
शिवटेकडीच्या मुद्द्यावर सडेतोड चर्चा
संदीप शिवनकर यांनी या भेटीत गिरड येथील श्रीराम मंदिराच्या विविध विषयांसह ‘शिवटेकडी’ या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाच्या नावाचा मुद्दा डॉ. तोगडिया यांच्यासमोर मांडला. एका विशिष्ट समुदायाकडून ‘शिव’ या नावाला होत असलेल्या विरोधाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. यावर डॉ. प्रवीण तोगडिया यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणाले की, “हिंदूंच्या अस्मितेशी जोडलेल्या कोणत्याही नावाला किंवा प्रतिकाला होणारा विरोध सहन केला जाणार नाही. शिवटेकडी हे नाव हिंदूंच्या श्रद्धेचे स्थान आहे आणि त्याला विरोध करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.”
हिंदू संघटनांच्या मजबुतीकरणावर भर
देशभरात हिंदू संघटनांना बळकट करण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे सांगत डॉ. तोगडिया यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. “हिंदू समाजाने संघटित होणे ही काळाची गरज आहे. केवळ संघटना मजबूत असेल तरच आपल्या श्रद्धास्थानांचे रक्षण होऊ शकते,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या विषयांवर विचारविनिमय
१३ आणि १४ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या डॉ. तोगडिया यांनी गिरड देवस्थानच्या कामाचे कौतुक केले. या भेटीत संदीप शिवनकर यांनी देवस्थानच्या वतीने सुरू असलेल्या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांची माहिती दिली. या चर्चेमुळे गिरड परिसरातील शिवटेकडीचा प्रश्न आता राष्ट्रीय स्तरावरील हिंदूवादी नेतृत्वापर्यंत पोहोचला असून, येणाऱ्या काळात या संदर्भात काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्य संपादक निलेश पिंजरकर स्काय न्यूज लाईव्ह