
*अधिसुचना डावलून आजंती येथील हायवेवर पेट्रोल विक्री सुरू; अपघाताची जबाबदारी कुणाची?*
मुख्य संपादक
*मुख्य संपादक स्काय न्यूज निलेश पिंजरकर वर्धा*
हिंगणघाट
आजंती येथील हैदराबाद हायवेला लागून असलेल्या ‘जी पॉईंट फ्युल स्टेशन’ या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (IOCL) पेट्रोल पंपाचा कारभार सध्या चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा पंप सुरू झाला असला तरी, अद्याप नॅशनल हायवे अथॉरिटीची (NHAI) अंतिम परवानगी मिळालेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशा स्थितीत विनापरवाना विक्री सुरू असतानाही संबंधित विभाग आणि कंपनीचे अधिकारी डोळेझाक का करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नियम धाब्यावर, प्रशासनाचे दुर्लक्ष
नॅशनल हायवेवर कोणताही व्यवसाय किंवा पंप सुरू करताना रस्ते सुरक्षा आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करून ‘फायनल एनओसी’ (NOC) घेणे अनिवार्य असते. मात्र, हिंगणघाट येथील कुंटेवार यांच्या मालकीच्या या ‘जी पॉईंट’ पंपाने अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे समजते. असे असतानाही मागील दोन वर्षांपासून येथे इंधन विक्री जोरात सुरू आहे.
महत्वाचे प्रश्न:
एनएचएआय गप्प का? नॅशनल हायवे विभागाला अशा विनापरवाना पंपांवर कारवाई करण्याचे आणि ते बंद करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. मग अद्याप कारवाई का झाली नाही?
सेल्स ऑफिसरची भूमिका संशयास्पद: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे सेल्स ऑफिसर या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष का करत आहेत? नियमांचे उल्लंघन होत असताना कंपनीने पुरवठा कसा सुरू ठेवला?
अपघाताची टांगती तलवार
हायवेवर असलेल्या पेट्रोल पंपांना विशिष्ट प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग (Entry/Exit points) असावे लागतात. परवानगी नसल्यास या ठिकाणी तांत्रिक त्रुटी असू शकतात. उद्या जर या ठिकाणी एखादा मोठा अपघात घडला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? विनापरवाना पंप सुरू ठेवणाऱ्या मालकावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
”विनापरवाना विक्री होत असेल तर तो रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
