डिझेल-पेट्रोल माफिया ‘दिलदार’चा गोरखधंदा आता ‘श्री धाब्यावर’!
नायरा डेपो परिसरातील तस्करीचे केंद्र बदलले; पोलीस व महसूल प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

वर्धा (प्रतिनिधी):
वर्धा लगतच्या नायरा डेपो परिसरातील पेट्रोल-डिझेल चोरीचे प्रकरण आता अधिकच गडद होत चालले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात सर्रास सुरू असलेल्या या गोरखधंद्यावर वृत्तपत्रांनी प्रकाश टाकल्यानंतर, कुख्यात माफिया दिलदार पठाण याने आता आपली कार्यपद्धती बदलली असून, त्याने आपले नवे बस्तान ‘श्री धाब्यावर’ हलवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात तस्करी होत असताना पोलीस आणि महसूल विभाग झोपेत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
रात्रीचा खेळ अन् टँकरचा आडोसा
मिळालेल्या माहितीनुसार, नायरा डेपोकडे जाणाऱ्या मार्गावरील ‘श्री धाब्यावर’ रात्रीच्या सुमारास टँकर उभे केले जातात. याच टँकरच्या आडोशाने दिलदार पठाण आणि त्याची टोळी मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलची चोरी करते. चोरलेले हे इंधन सुरक्षितरीत्या तस्करी करून त्याच्या मूळ गावी, म्हणजेच सूरगाव येथे नेले जाते. विशेष म्हणजे, या संपूर्ण व्यवसायात त्याला त्याच्या वडिलांचे पाठबळ असून, सूरगाव परिसरातच बेकायदेशीर विक्रीचे मोठे जाळे पसरले आहे.
घरांमध्ये इंधनाचा साठा; मोठ्या दुर्घटनेची टांगती तलवार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरलेले पेट्रोल आणि डिझेल केवळ विकले जात नाही, तर दिलदारच्या काही घरांमध्ये त्याचा अवैध साठा केला जातो. दाट वस्तीत अशा प्रकारे ज्वालाग्राही पदार्थांची साठवणूक करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे. एखादी ठिणगी पडल्यास संपूर्ण परिसर भस्मसात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरीही महसूल विभागाला या साठवणुकीचा पत्ता कसा लागत नाही, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
लक्झरी गाड्यांचा तस्करीसाठी वापर
या अवैध धंद्यातून कमावलेल्या पैशातून माफीयाने मोठा ताफा तयार केला आहे. इंधन तस्करीसाठी प्रामुख्याने i10, अल्टो, वॅगनार आणि नुकतीच खरेदी केलेली नवीन कोरी डिझायर या गाड्यांचा वापर केला जात असल्याची खात्रीशीर माहिती आहे. या गाड्यांमधून छुप्या पद्धतीने इंधन वाहून नेले जाते.
प्रशासनासमोर मोठे आव्हान
पेट्रोल पंप धारक आधीच आर्थिक संकटात असताना, अशा प्रकारे सुरू असलेल्या समांतर ‘ब्लॅक मार्केट’मुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात!
पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग या माफियाच्या मुसक्या आवळणार की, मागील अनुभवाप्रमाणे पुन्हा एकदा डोळेझाक करून त्याला मोकळे रान देणार? नागरिकांच्या नजरा आता या कारवाईकडे लागल्या आहेत.
सावंगी ठाणेदार राष्ट्रीय हात मिळवणे अर्थसाह्य पूर्ण दुर्लक्ष….
डी बी पथकामध्येम असणारे संजय पंचभाई हे वसुलीधारक पथकाचे मुखिया…