
देवळी पोलिसांची मोठी कारवाई: अवैध दारू भट्टी आणि जुगारावर धाडी; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, गुंडांना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू
देवळी: अवैध गावठी मोहा दारू गाळणारे, विक्री करणारे, देशी-विदेशी दारूची तस्करी करणारे तसेच जुगार अड्ड्यांवर देवळी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिनांक २६ मे २०२६ ते ३१ मे २०२६ या कालावधीत राबविलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अनेक आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले (उपविभाग पुलगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली देवळीचे ठाणेदार संदीप कापडे व पोलीस स्टेशनच्या अंमलदारांनी गुप्त माहितीच्या आधारे केली.
अवैध दारू व्यवसायावर २५ गुन्हे, २० लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त
पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा वायगाव, रोहणी आणि देवळी टाऊन परिसरात अवैध दारू गाळणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या ठिकाणांवर धाडी टाकल्या. या कारवाईत दारूबंदी कायद्यान्वये एकूण २३ गुन्हे नोंदवण्यात आले असून, आरोपींकडून २०,७२,४५० रुपयांचा (२० लाख ७२ हजार ४५० रुपये) मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दारूबंदी कारवाईतील आरोपींची नावे:
वायगाव निपाणी परिसर: शंकर जाधव, परवेज रशीद शेख.
देवळी परिसर: योगेश मारोतराव करपाते, निरंजन भगवानजी पाटमासे, देउ बापुराव पारीसे, गंगुबाई अशोक बावणकर, छाया जयनारायण सांडे, कुणाल मारोतराव आंबटकर.
रोहणी परिसर: दुर्गादास कामतवार, लक्ष्मण कामतवार, पिटु कामतवार, शंकर कामतवार, संतोष कामतवार, प्रमोद कामतवार, संदीप कामतवार.
इतर भागातील आरोपी: अनिल निळकंठराव मुरार, उमेश अनिलराव मुरार (दोघे रा. भिडी), जितेंद्र उत्तमराव नगराळे (रा. कोल्हापूर राव), विजय पधराम (रा. अंदोरी), श्रंजीत लक्ष्मण तेलंगे (रा. अंबोडा), सौरभ गुणवंतराव पठाडे (रा. काजळसरा).
जुगार अड्ड्यांवर धाडी; ३ गुन्हे दाखल
दारूबंदीसोबतच वायगाव, देवळी आणि अंदोरी परिसरात अवैध जुगार खेळणाऱ्या आणि खेळवून घेणाऱ्यांवरही पोलिसांनी धडक कारवाई केली. याअंतर्गत ०३ गुन्हे नोंदवून आरोपींकडून १,४९,०७० रुपयांचा (१ लाख ४९ हजार ७० रुपये) माल जप्त करण्यात आला.
जुगार कारवाईतील आरोपी:
किरण घोडमारे, स्वप्नील आटे, विजय हातमोडे (सर्व रा. वायगाव निपाणी), विजय धोंगडे, किशोर कामडी (दोघे रा. देवळी) आणि राष्ट्रपाल गौतम हांडे (रा. आडेगाव).
५ गुंडांना तडीपार करण्याचे प्रस्ताव; २ जणांवर कडक वॉच
देवळी पोलीस स्टेशन परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या ०५ लोकांना जिल्ह्यातून तडीपार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यापूर्वीच ०२ इसम तडीपार असून, ते देवळी पोलिसांच्या हद्दीत पुन्हा येणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. यासाठी देवळी पोलीस या तडीपार इसमांच्या घरी जाऊन वारंवार चेकिंग करत असून त्यांच्यावर कडक पाळत ठेवून आहेत.
महिला मंडळांच्या मदतीने अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करणार!
अवैध धंद्यांना कायमचा आळा घालण्यासाठी देवळी पोलिसांनी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. पोलिसांनी गावोगावी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला आहे. गावागावांमध्ये “दारूबंदी महिला मंडळ” तयार करण्यासाठी महिलांना प्रोत्साहित केले जात आहे. आगामी दिवसांत जास्तीत जास्त गावांमध्ये अशी मंडळे स्थापन करून, गावात चोरून-लपून चालणारी अवैध दारू विक्री आणि जुगार यांचे समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प पोलिसांनी केला आहे.
धडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले
देवळीचे ठाणेदार श्री. संदीप कापडे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच अवैध धंद्यांवर सातत्याने धाडी टाकून कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. मोठ्या प्रमाणावर गावगुंडांवर तडीपारीची प्रक्रिया सुरू केल्यामुळे तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा वचक निर्माण झाला आहे.