
पर्यावरणाचे रक्षण म्हणजे पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करणे: आदर्श शिक्षक मोहन मोहिते
वर्धा (बोरगाव मेघे):
“आज वाढते प्रदूषण, जंगलतोड, पाण्याची टंचाई आणि हवामान बदल ही आपल्यासमोरील गंभीर आव्हाने आहेत. निसर्गावर मात करण्याच्या मानवाच्या प्रयत्नांमुळेच ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजे केवळ सरकारी योजना राबवणे नव्हे, तर आपल्या पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करणे होय. ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक मोहन मोहिते यांनी केले.
ते बोरगाव मेघे येथील सेंट थॉमस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित ‘जागतिक पर्यावरण दिन’ कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
वर्ध्यातील वाढत्या तापमानावर चिंता: ‘समृद्धी’सह महामार्गांमधील वृक्षतोड कारणीभूत
आपल्या भाषणात मोहिते सरांनी वर्ध्यातील यावर्षीच्या भीषण उन्हाळ्यावर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “यावर्षी वर्ध्यामध्ये उन्हाचा पारा ४७ अंश सेल्सिअसच्या पार गेला होता, आणि सलग सात दिवस तापमान ४७ अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. याचे मुख्य कारण म्हणजे समृद्धी महामार्ग तसेच इतर राज्य महामार्गांच्या बांधकामासाठी झालेली मोठमोठ्या वृक्षांची बेसुमार कत्तल होय. रस्त्यांच्या विकासासाठी झाडे तोडताना नवीन झाडे लावण्याची सक्ती होती, परंतु प्रशासनाकडून आणि संबंधित यंत्रणांकडून ती पूर्ण केली गेली नाही.”
’येळाकेळी’ रोडवरील आमराई नष्ट झाल्याची खंत
भूतकाळातील आठवणींना उजाळा देत त्यांनी सांगितले की, पूर्वी येळाकेळी रोडवर आंब्याची मोठी आमराई होती. तो रस्ता संपूर्ण सावलीचा रस्ता म्हणून ओळखला जायचा. परंतु आज महामार्गांच्या नावाखाली ही झाडे तोडल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे ओसाड झाला आहे. वर्ध्यात अशा अनेक मार्गांवरील झाडे कापली गेली, पण त्या बदल्यात नवीन झाडे लावलीच गेली नाहीत. परिणामी, आज वर्ध्याचे तापमान चंद्रपूर आणि अकोल्यापेक्षाही अधिक धगधगत आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे आता प्रत्येक नागरिकाने स्वतःहून किमान एक झाड लावून ते जगवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
लहान लहान कृतींमधूनच घडेल मोठा बदल
पर्यावरण म्हणजे केवळ झाडे नसून हवा, पाणी, जमीन, पशुपक्षी आणि मानव यांचे एकमेकांशी असलेले अतूट नाते आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर टाळावा, पाण्याची बचत करावी आणि परिसराची स्वच्छता राखावी. “झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा आणि भविष्य घडवा” या संदेशाचा अवलंब केल्यास लहान लहान कृतींमधूनही खूप मोठा सकारात्मक बदल घडू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती
या पर्यावरण दिन विशेष कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बोरगावचे माजी सरपंच श्री. संतोषराव सेलूकर, माजी सदस्य श्री. नितीनजी डफरे, बोरगाव ग्रामपंचायतीचे सचिव श्री. गायकवाड साहेब, तसेच सेंट थॉमस इंग्लिश स्कूलचे संचालक श्री. विजयजी सत्यम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.