
वर्धा जिल्ह्यातील सिंधी (रेल्वे) पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध इंधनाचा काळाबाजार जोरात; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष!
वर्धा:
वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे पोलीस प्रशासनाच्या कथित ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे खडकी परिसरात अवैध पेट्रोल आणि डिझेलची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. परिसरात कार्यरत असलेल्या एका इंधन माफियाकडून राजरोसपणे हा काळाबाजार चालवला जात असून, यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या गंभीर प्रकाराकडे आता वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
नायरा डेपोच्या नावाखाली इंधनाची चोरी
वर्धा जिल्ह्यात प्रसिद्ध ‘नायरा इंधन डेपो’ असल्यामुळे या ठिकाणाहून दररोज शेकडो टँकरच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो. मात्र, याच वाहतुकीचा गैरफायदा काही समाजकंटकांकडून घेतला जात आहे. खडकी परिसरातील इमरान अली सय्यद नावाचा कथित पेट्रोल-डिझेल माफिया गेल्या कित्येक वर्षांपासून या मार्गावरून जाणाऱ्या टँकरमधून छुप्या पद्धतीने इंधन चोरी करत असल्याचा आरोप आहे. टँकर चालकांशी संगनमत करून हा काळाबाजार राजरोसपणे सुरू आहे.
बांबूच्या शेतात आणि घरात साठवणूक; सुरक्षेचा मोठा प्रश्न
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टँकरमधून चोरलेले पेट्रोल आणि डिझेल २० लिटरच्या प्लास्टिक कॅनमध्ये भरले जाते. कारवाई टाळण्यासाठी हे कॅन खडकी परिसरातील बांबूच्या शेताच्या आडोशाला आणि झुडपांमध्ये लपवून ठेवले जातात. त्यानंतर हा साठा इमरान अली याच्या खडकी येथील राहत्या घरी नेऊन जमा केला जातो. निवासी भागात अत्यंत ज्वलनशील असलेल्या पेट्रोल-डिझेलचा अशा प्रकारे अवैध साठा केला जात असल्याने परिसरात मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली असून, स्थानिक नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.
सिंधी रेल्वे पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?
या बेकायदेशीर धंद्याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा सिंधी रेल्वे पोलीस ठाण्यात लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, पोलिसांकडून या माफियावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेमुळे आणि ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे या माफियाचे मनोबल कमालीचे वाढले असून, त्याचे अवैध साम्राज्य दिवसेंदिवस अधिकच विस्तारत चालले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची आस!
स्थानिक सिंधी रेल्वे पोलीस या गंभीर प्रकरणाकडे डोळेझाक करत असल्याने आता थेट वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक महोदयांनीच या प्रकरणात वैयक्तिक रित्या लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलीस अधीक्षक या इंधन माफियाच्या मुसक्या आवळणार का? आणि निष्क्रीय ठरलेल्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.