
९०% पंपांना निर्बंध, तर १०% ‘लाडक्या’ पंपांवरून लाखो लिटर इंधनाचा काळाबाजार; वडनेर-दारोडा रोडवरील कारवाईने खळबळ
वडनेर/दारोडा:
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कंपनीच्या कारभारात सध्या प्रचंड दुजाभाव पाहायला मिळत असून, “एक सासूचा तर एक जावयाचा” किंवा “एकाला मावशीचा तर एकाला मायचा” असा न्याय कंपनीकडून लावला जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. कंपनीने ९०% सामान्य पंपधारकांना पेट्रोल आणि डिझेल मोजून-मापून (आटोक्यात) विकण्याचे कडक आदेश दिले असताना, दुसरीकडे मात्र अवघ्या १०% ‘दत्तक पुत्रांसारख्या’ लाडक्या पंपधारकांवर मेहरबानीची बरसात केली जात आहे. याच मेहरबानीच्या जोरावर लाखो लिटर इंधनाचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
काल वडनेर ते दारोडा रोडवर असलेल्या एका एचपीसीएल (HPCL) पेट्रोल पंपावर प्रशासनाने मोठी कारवाई केली. या कारवाईत चक्क पेट्रोल पंपावरूनच ३५,००० लिटरचा भलामोठा टँकर बेकायदेशीरपणे भरला जात असताना रंगेहात पकडण्यात आला.
दोन महिन्यांपासून सुरू होता गोरखधंदा!
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून या पंपावर हा काळाबाजार राजरोसपणे सुरू होता. सर्वसामान्य ग्राहकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी डिझेलचा तुटवडा दाखवायचा आणि रात्रीच्या अंधारात किंवा छुप्या पद्धतीने मोठ्या कंपन्या आणि फॅक्टऱ्यांना इंधनाचा पुरवठा करायचा, असा हा संपूर्ण डाव होता.
काळाबाजाराचे गणित:
किरकोळ विक्रीपेक्षा मोठ्या कंपन्यांना आणि फॅक्टऱ्यांना बेकायदेशीरपणे इंधन पुरवल्यास पंप मालकाला प्रति लिटर तब्बल ८ ते १० रुपये जास्त नफा (Profit) मिळत होता. याच अवाढव्य नफ्याच्या हव्यासापोटी सर्वसामान्य नागरिकांचा हक्क मारून हा ब्लॅक मार्केटचा धंदा सुरू होता.
भंडारा येथील फिरोज सिद्दकी ‘मास्टरमाइंड’?
या काळ्याबाजाराच्या केंद्रस्थानी भंडारा येथील रहिवासी फिरोज सिद्दकी नावाचा पंप चालक असल्याचे समोर आले आहे. सिद्दकी यांचे अशाच प्रकारे आणखी ५ पेट्रोल पंप असल्याची प्राथमिक माहिती आहे. जर प्रशासनाने फिरोज सिद्दकी यांच्या मालकीच्या सर्व पंपांची सखोल चौकशी केली आणि तिथले सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले, तर या संपूर्ण आंतरजिल्हा गोरखधंद्याचा आणि काळ्या बाजाराचा ‘मास्टरमाइंड’ समोर येईल, यात शंका नाही. या गंभीर प्रकारामुळे त्यांचे पंपाचे परवाने रद्द होण्याची दाट शक्यता आहे.
’हात ओले’ झाल्यामुळे अधिकारी मूग गिळून?
”अशा बड्या कारवाया होऊनही पुढे काहीच होत नाही,” अशी चर्चा आता नागरिकांमध्ये आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात ९०% पंपांचा कोटा कापून विशिष्ट पंपांनाच लाखो लिटर डिझेल-पेट्रोलचा पुरवठा केला कसा जातो? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. एचपीसीएल कंपनीचे स्थानिक सेल्स ऑफिसर (Sales Officer) यांच्यापासून ते थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच ‘हात ओले’ झाले असल्यामुळेच हा काळाबाजार राजरोसपणे सुरू असल्याचा थेट आरोप आता केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या अभयामुळेच या पंप चालकांचे धाडस वाढले आहे.
शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक होरपळले!
या साऱ्या भ्रष्ट कारभारामुळे सामान्य नागरिक आणि विशेषतः शेतकरी वर्ग होरपळून निघाला आहे. ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर उपकरणांसाठी पाहिजे तितके डिझेल पंपावर मिळत नाही. “डिझेल संपले आहे,” असे सांगून शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले जाते, ज्यामुळे शेतीची कामे रखडली आहेत.
प्रशासनासमोर मोठे आव्हान: कारवाई होणार की पाठीशी घातले जाणार?
वडनेर-दारोडा रोडवरील या कारवाईनंतर आता संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात गुंतलेले एचपीसीएल कंपनीचे सेल्स ऑफिसर, वरिष्ठ अधिकारी आणि मुख्य संशयित फिरोज सिद्दकी यांच्यावर प्रशासन काय आणि किती कठोर कारवाई करणार? की दरवेळेप्रमाणे हे प्रकरणही दडपले जाणार? याकडे सर्वसामान्य जनतेचे आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.