
वर्ध्यात नियम धाब्यावर! आर्वी रोडवरील ‘त्या’ पेट्रोल पंपावर अपघाताचे सावट; प्रशासनाचे दुर्लक्ष
वर्धा:
शहरालगत असलेल्या मौजा पिंपरी, आर्वी रोड या नॅशनल हायवेवर कार्यरत असलेला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा (BPCL) पेट्रोल पंप सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संजय वानखेडे यांच्या मालकीचा हा पेट्रोल पंप शासकीय नियमांची उघडपणे पायमल्ली करत असल्याचा आरोप नागरिक आणि तज्ज्ञांकडून केला जात आहे. हायवेवरील वाढती वाहतूक आणि पंपावरील त्रुटी पाहता, येथे मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहेत मुख्य आक्षेप?
या पेट्रोल पंपाच्या बांधकामात आणि संचालनात रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) घालून दिलेल्या मानकांचे उल्लंघन झाल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे:
एन्ट्री आणि एक्झिटमधील त्रुटी: नियमानुसार, हायवेवरील पेट्रोल पंपाची एन्ट्री ७० मीटर आणि एक्झिट १०० मीटर असावी लागते, तसेच त्याची रुंदी किमान ५.५ मीटर असणे बंधनकारक आहे. मात्र, या पंपावर ना निश्चित लांबी आहे ना रुंदी.
सुरक्षा साधनांचा अभाव: सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले चेवरॉन मार्किंग (Chevron Marking), सेपरेटर, आयटलंड, कर्बस्टोन, यांपैकी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाही.
अंतर नियमांचे उल्लंघन (Place of Assembly): पेट्रोल पंपाच्या लगतच एक रिसॉर्ट आहे. नियमानुसार, अशा ‘प्लेस ऑफ असेम्ब्ली’ (सार्वजनिक गर्दीचे ठिकाण) पासून पंप किमान ५० मीटर दूर असणे आवश्यक आहे. मात्र, येथे हे अंतर पाळले नसल्याचे चित्र आहे.
जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?
वर्धा-आर्वी हायवे हा सध्या ‘अन-डिवायडेड कॅरेज वे’ स्वरूपाचा असून येथे २४ तास वाहनांची मोठी वर्दळ असते. पंपावर शिरताना किंवा बाहेर पडताना नियमांचे पालन न झाल्यामुळे कोणत्याही क्षणी भीषण अपघात होऊ शकतो.
”जर भविष्यात येथे एखादी मोठी जीवितहानी झाली, तर त्याची जबाबदारी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) घेणार की ज्यांनी याला परवानगी दिली तो राष्ट्रीय महामार्ग विभाग नागपूर घेणार?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाची भूमिका काय?
एकीकडे शासन रस्ते सुरक्षा सप्ताह राबवून जनजागृती करत असताना, दुसरीकडे नॅशनल हायवेवर अशा प्रकारे नियमांना हरताळ फासून पंप चालविले जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
.
मुख्य संपादक स्काय न्यूज लाईव्ह ऑनलाईन
निलेश पिंजरकर
