
वर्धा सिंचन विभागात वेळेचा खेळ; २२ पैकी फक्त ४ कर्मचारी वेळेवर हजर!
सकाळी ९.४५ ची वेळ, अधिकारी-कर्मचारी मात्र दुपारी कार्यालयात; बायोमेट्रिक यंत्रणेचा उडाला फज्जा, नागरिकांची प्रचंड गैरसोय.
वर्धा
शासकीय कार्यालयांमध्ये शिस्त आणि वेळेचे पालन व्हावे यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू केली. मात्र, वर्धा जिल्ह्यातील पाटबंधारे जलसंपदा सिंचन विभागात या नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कार्यालयाची अधिकृत वेळ सकाळी ९.४५ ची असताना, कर्मचारी आणि अधिकारी मात्र आपल्याच धुंदीत दुपारी कार्यालयात हजेरी लावत आहेत. आमच्या प्रतिनिधींनी केलेल्या ‘रियालिटी चेक’मध्ये एकूण २२ कर्मचाऱ्यांपैकी केवळ ४ कर्मचारी वेळेवर हजर असल्याचे आढळून आले, तर उर्वरित १८ जण गायब होते.
प्रतिनिधीने उघड केला ‘लेटलतिफांचा’ कारभार
आज सकाळी ठीक ९.४५ वाजता आमचे प्रतिनिधी निलेश पिजरकर यांनी वर्धा येथील पाटबंधारे जलसंपदा सिंचन विभागाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यालयातील दृश्य अत्यंत धक्कादायक होते. बहुतांश टेबल रिकामी होती आणि खुर्च्यांवर शुकशुकाट होता. उपस्थिती पत्रक आणि बायोमेट्रिक मशीनची पाहणी केली असता, एकूण २२ मंजूर कर्मचाऱ्यांपैकी केवळ ४ कर्मचाऱ्यांनीच वेळेवर उपस्थिती लावली होती. उर्वरित कर्मचारी आणि जबाबदार अधिकारी कार्यालयातून नदारद होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक कर्मचारी रोजच सकाळी दांडी मारतात आणि थेट दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास आरामात कार्यालयात पोहोचतात. शासकीय वेळेचे असे सर्रास उल्लंघन होत असल्याने या विभागाचा कारभार रामभरोसे चालला आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
’बायोमेट्रिक’ यंत्रणेचा पार फज्जा!
शासकीय कर्मचाऱ्यांच्या लेट लतिफ कारभाराला चाप लावण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली आहे. मात्र, या कार्यालयात बायोमेट्रिक यंत्रणेचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसत आहे. मशीन असूनही कर्मचारी उशिरा का येतात? त्यांच्यावर कोणतीही प्रशासकीय कारवाई का होत नाही? बायोमेट्रिकचा डेटा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासला जातो की नाही? असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
दूरवरून आलेल्या नागरिकांना मनस्ताप, आल्या पावली परत जाण्याची वेळ
सिंचन विभागाशी संबंधित विविध कामांसाठी, दाखल्यांसाठी आणि शेतीशी निगडित तक्रारींसाठी वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून अनेक शेतकरी व सामान्य नागरिक सकाळीच कार्यालयात पोहोचतात. मात्र, अधिकारी आणि कर्मचारीच जागेवर नसल्याने या नागरिकांना ताटकळत बसावे लागते.
”आम्ही सकाळी नऊ वाजेपासून बसून आहोत. साहेब कधी येतील याचा काहीच नेम नाही. दुपार होत आली तरी टेबल रिकामीच आहेत. आमचे ऐकणार कोण? आम्हाला रोज भाडे खर्च करून चकरा माराव्या लागतात.”
— कार्यालयात आलेले त्रस्त नागरिक.
अनेक नागरिकांना तर संपूर्ण दिवस वाट पाहून, काम न होताच निराश होऊन आल्या पावली परत जावे लागत आहे.
वरिष्ठ अधिकारी कारवाईचा बडगा उगारणार का?
या संपूर्ण प्रकारामुळे सिंचन विभागाच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. आता या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी या ‘लेटलतिफ’ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात? त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार का? आणि मुख्य म्हणजे सिंचन विभागातील हा ‘वेळेचा खेळ’ थांबून नागरिकांना दिलासा मिळणार का? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.