
पुरवठा विभागाच्या कारवाईतून पळ काढण्याचा प्रयत्न; १९ सिलिंडर जप्त, एजन्सी रद्द होणार का?
वर्धा/गिरड:
नागपूर जिल्ह्यातील नांद येथील यशश्री भारत गॅस एजन्सीने आपली सीमा ओलांडून वर्धा जिल्ह्यातील गिरड परिसरात अवैध धंद्याचा विळखा घातल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसे उकळत या एजन्सीने काळाबाजाराचा मोठा अड्डाच गिरडमध्ये थाटला असून, नुकत्याच झालेल्या पुरवठा विभागाच्या कारवाईत या गोरखधंद्याचे पितळ उघडे पडले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
यशश्री गॅस एजन्सीचे कार्यक्षेत्र नागपूर जिल्ह्यात असताना, नियमांना धाब्यावर बसवून ही एजन्सी वर्धा जिल्ह्यातील गिरड परिसरात मोठ्या प्रमाणात सिलिंडरची विक्री करत आहे. विशेष म्हणजे, गिरड येथील कोणत्याही सीएससी (CSC) सेंटरला अधिकृत वितरणाचे पॉईंट न देता किंवा कुठल्याही प्रकारचे साठवणुकीचे परवाने नसताना, या ठिकाणी अवैधपणे गॅस सिलिंडरचा साठा आणि विक्री सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती.
अधिकाऱ्यांना पाहताच गाडी पळवण्याचा प्रताप
मिळालेल्या माहितीनुसार, पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांनी गिरड परिसरात सापळा रचून यशश्री गॅसची गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईच्या भीतीने भरलेले सिलिंडर घेऊन गाडी पळवण्याचे धाडस केले. अधिकाऱ्यांच्या हाती केवळ १९ रिकामे सिलिंडर लागले आहेत. भरलेले सिलिंडर पळवून नेल्यामुळे यामागे मोठे रॅकेट असल्याचे स्पष्ट होत आहे.
जनतेची लूट आणि सुरक्षेचा प्रश्न
गिरड परिसरातील सर्वसामान्य ग्राहकांकडून हे वितरक निर्धारित दरापेक्षा कितीतरी जास्त पैसे वसूल करत आहेत. गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक ही केवळ आर्थिक फसवणूक नसून, सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत घातक आहे. विनापरवाना साठा केल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
”एकीकडे महागाईने जनता होरपळत असताना, दुसरीकडे शेजारील जिल्ह्यातील गॅस एजन्सी गिरडमध्ये येऊन काळाबाजार करत आहे. अशा मुजोर एजन्सीवर कठोर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करावा.”
— संतप्त नागरिक, गिरड
पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष
पुरवठा विभागाने रिकामे सिलिंडर जप्त केले असले तरी, मुख्य आरोपी आणि एजन्सी मालकावर काय कारवाई होणार? यशश्री भारत गॅस एजन्सीचा परवाना रद्द होणार का? की हा प्रकार दबावाखाली दडपला जाणार? असे अनेक प्रश्न आता सर्वसामान्यांकडून विचारले जात आहेत. पुरवठा विभागाच्या पुढील पाऊलाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
