
न्यूज पॉईंटर
- वर्ध्यात पुरवठा विभागाची मोठी कारवाई; हजारो टन अवैध गहू-तांदळाचा साठा जप्त!
- बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले रॅकेट;
- एमआयडीसी परिसरातील गोडाऊन केले सील.
- कारवाई सुरू असतानाच गोडाऊन चालक शेख रहीम फरार; मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू.
अँकर : वर्धा शहरातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. वाढत्या महागाईचा फायदा घेत गरिबांच्या हक्काच्या धान्याची चोरी करून साठवणूक करणाऱ्या रॅकेटचा वर्धा तहसील पुरवठा विभागाने पर्दाफाश केला आहे. सेवाग्राम रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका अवैध गोडाऊनवर धाड टाकून हजारो टन गहू आणि तांदळाचा साठा जप्त करण्यात आला आहे.”
“मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना या अवैध साठवणुकीची कुणकुण लागली होती. जिल्हा संयोजक बबलू राऊत, प्रशांत यादव आणि इतर सहकाऱ्यांनी गोडाऊनवर जाऊन खातरजमा केली. गोडाऊन चालकाकडे साठ्याबाबत विचारणा केली असता, तो कोणतीही कागदपत्रे दाखवू शकला नाही. त्यानंतर तात्काळ तहसील पुरवठा अधिकारी मनीषा माजरखेडे यांना पाचारण करण्यात आले.”
“पुरवठा अधिकारी मनीषा माजरखेडे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचून सखोल चौकशी केली. यावेळी गोडाऊनमध्ये हजारो टन गहू आणि तांदळाचा साठा आढळून आला. विशेष म्हणजे, गोडाऊनच्या बाहेर एका ऑटोमध्ये विक्रीसाठी नेला जाणारा मालही पथकाने पकडला. या साठ्याबाबत कोणतेही अधिकृत बिल किंवा परवाना नसल्यामुळे संपूर्ण गोडाऊन सील करण्यात आले आहे.”
“या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार आणि गोडाऊन चालक शेख रहीम शेख करीम हा अधिकारी कारवाई करत असताना ‘बिल घेऊन येतो’ असे सांगून घटनास्थळावरून फरार झाला आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी सालोड हिरापूर आणि नेरी पुनर्वसन परिसरातही त्याच्यावर अशाच प्रकारची कारवाई झाली होती. या रॅकेटचे मुख्य धागेदोरे सालोड टी-पॉइंट आणि नेरी पुनर्वसन परिसरात असल्याची माहिती समोर येत आहे.”
“पुरवठा विभागाने आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्धार केला असून, फरार शेख रहीम आणि या रॅकेटमधील इतर मुख्य सूत्रधार लवकरच रडारवर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.”
“वर्ध्यातील या कारवाईमुळे धान्य माफियांचे धाबे दणाणले आहेत. एकीकडे सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत असताना, दुसरीकडे अशा प्रकारे धान्याची अवैध साठवणूक करून काळाबाजार करणाऱ्यांवर आता प्रशासन कठोर कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
