
बिनबुडाच्या बातम्यांद्वारे, नगर परिषदेकडून नोटीस, न्यायालयीन कारवाईची शक्यता
वर्धा (विशेष प्रतिनिधी) : लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेच्या पवित्र क्षेत्राला वर्धा जिल्ह्यात काही व्यक्तींच्या वर्तनामुळे गालबोट लागल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ‘दैनिक भास्कर’चे वर्धा जिल्हा प्रतिनिधी संजय ओझा यांच्यावर पत्रकारितेच्या नावाखाली वसुली केल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. कोणतीही ठोस पडताळणी न करता बिनबुडाच्या बातम्या प्रसिद्ध करणे आणि त्या बदल्यात संबंधित व्यक्तींवर दबाव टाकून पैशांची मागणी करणे, अशा प्रकारच्या तक्रारी सध्या चर्चेत आहेत.
नगर परिषद प्रशासनाची नोटीस
संजय ओझा यांच्या कारभाराची दखल प्रशासनानेही घेतल्याची माहिती समोर येत आहे. वर्धा नगर परिषदेकडून त्यांना नुकतीच नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे व चुकीच्या माहितीच्या आधारे बातम्या प्रसिद्ध करणे या कारणांवरून ही नोटीस देण्यात आल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील पत्रकारितेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सहकारी पत्रकाराची बदनामी
केवळ नागरिकच नव्हे तर आपल्या क्षेत्रातील सहकाऱ्यांनाही ओझा यांनी लक्ष्य केल्याचा आरोप आहे. एका मोठ्या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराबाबत कोणतीही शहानिशा न करता बिनबुडाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली. या घटनेनंतर संबंधित पत्रकाराने न्यायालयीन लढाईची तयारी सुरू केली असून, ओझा यांना आता न्यायालयात आपल्या बातमीचे पुरावे सादर करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
नागरिकांमध्ये संताप
संजय ओझा हे सातत्याने शासकीय अधिकारी, व्यापारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींविरोधात वैयक्तिक हेतूने बातम्या प्रसिद्ध करून त्यांना मानसिक त्रास देत असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत.
“सत्यता पडताळणी न करता केवळ पैशांसाठी बातम्या छापणे ही पत्रकारिता नसून सरळसरळ ब्लॅकमेलिंग आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष
या संपूर्ण प्रकरणामुळे मोठ्या वृत्तसंस्थेच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची चर्चा आहे. आता या प्रकरणात पोलीस व वरिष्ठ प्रशासन नेमकी काय कारवाई करते, याकडे वर्धा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
