
सिंदी रेल्वे हादरली! ग्रामीण रुग्णालयासाठी ५५० नागरिकांनी रक्ताने लिहिले पत्र; आंदोलन पेटले
सिंदी (रेल्वे): नीलेश पींजरकर..
आपल्या हक्काच्या आरोग्य सुविधेसाठी सिंदी रेल्वे येथील नागरिक आता आक्रमक झाले असून, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी एक हृदयद्रावक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. सिंदी येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे या मागणीसाठी तब्बल ५५० पेक्षा अधिक नागरिकांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून सरकारचा निषेध नोंदवला आहे. रक्ताने लिहिलेली ही पत्रे आता शासनाकडे पाठवण्यात आली असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका विषय काय?
सिंदी रेल्वे आणि परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या असलेल्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याने, येथे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय व्हावे ही जनतेची जुनी मागणी आहे. मात्र, शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने अखेर जनतेचा संयम सुटला आहे.
आंदोलनाचा थरार: ‘आता माघार नाही’
बस स्टँड चौक आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाने पहिल्याच दिवशी तीव्र रूप धारण केले.
रक्ताने स्वाक्षरी: केवळ घोषणाबाजी न करता, तरुणांपासून वृद्धांपर्यंत शेकडो नागरिकांनी आपले रक्त काढून पत्रावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
जनक्षोभ: “आमच्या आरोग्याचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
पुढील दोन दिवस महत्त्वाचे
मिळालेल्या माहितीनुसार, हे आंदोलन थांबणार नसून उद्या आणि परवा अधिक तीव्र स्वरूपात सुरू राहणार आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत नागरिक मागे हटण्यास तयार नाहीत. या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
”हे केवळ आंदोलन नाही, तर जगण्यासाठीचा संघर्ष आहे. ५५० जणांचे रक्त सांडले तरी सरकारला जाग येत नसेल, तर हे लोकशाहीचे दुर्दैव आहे.” – एक आंदोलक