
पारधी बेड्यावरून उंच भरारी: दिव्या काळेचे CBSE पॅटर्नमध्ये 91.4% यश, IPS स्वप्नाला प्रशासनाची साथ
“दिव्या काळेच्या यशाचा गौरव! उपविभागीय अधिकारी-तहसीलदारांनी घरी जाऊन दिले जात प्रमाणपत्र”
वर्धा, ता. १७ : जिल्हा प्रतिनिधी – वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील जामणी साखरकारखान्याजवळील उपेक्षित पारधी बेड्यावरून एक प्रेरणादायी यशोगाथा समोर आली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या दिव्या रवी काळे या विद्यार्थिनीने CBSE पॅटर्नमध्ये तब्बल 91.4 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिचे स्वप्न आहे – IPS अधिकारी होण्याचे, आणि त्या दिशेने तिने पहिली भक्कम पायरी गाठली आहे.
या यशामागे तिच्या आई अश्विनी काळे यांचा संघर्ष आणि त्याग मोठा आहे. बालविवाहामुळे स्वतःचे शिक्षण आणि अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले, पण त्यांनी तेच स्वप्न आपल्या मुलीत रुजवले. अत्यंत कठीण परिस्थितीतही दिव्याला शिक्षणासाठी प्रेरित करत त्यांनी तिच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचे काम केले.
मात्र, या प्रवासात सर्वात मोठा अडथळा ठरला तो म्हणजे जात प्रमाणपत्राचा. आदिवासी पारधी समाजाच्या सतत भटकंती जीवनशैलीमुळे शासन नोंदींचा अभाव असल्याने 1950 चा पुरावा सादर करणे कठीण होते. त्यामुळे जात प्रमाणपत्रासाठी दिव्या आणि तिच्या आईला अनेक वर्षे तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या, पण प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली.
दरम्यान, वर्धा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या क्रांतिवीर समशेरसिंग पारधी शिक्षण जागर यात्रा आणि आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने परिस्थितीत बदल घडू लागला. नागपूर येथील अपर आयुक्त आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वर्धा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गीतांजली निकम यांच्या सहकार्याने ही यात्रा जिल्ह्यातील 54 पारधी बेड्यांपर्यंत पोहोचली.
याच मोहिमेदरम्यान दिव्या आणि तिच्या आईची जिद्द शिक्षण जागर यात्रेचे प्रतिनिधी अनिल पवार यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ प्रशासनाशी समन्वय साधत निवासी उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, उपविभागीय अधिकारी दीपक करांडे आणि तहसीलदार डॉ. शकुंतला पराजे यांची भेट घडवून आणली.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने तातडीने पावले उचलली. सेलू तालुक्यातील पारधी बेड्यांवर भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जामणी पारधी बेड्यावर विशेष राजस्व शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 30 हून अधिक विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र प्रकरण तयार करण्यात आले.
दिव्याच्या यशाचा गौरव करण्यासाठी वर्धा उपविभागीय अधिकारी दीपक करांडे आणि तहसीलदार डॉ. शकुंतला पराजे यांनी तिच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी दिव्या आणि तिच्या आईच्या हातात जात प्रमाणपत्र सुपूर्द केले, जो क्षण अत्यंत भावनिक ठरला. त्याचवेळी जामणी पारधी बेड्यावरील 29 विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन शाळकरी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
दिव्या काळेची ही यशोगाथा केवळ एका विद्यार्थिनीची कथा नाही, तर ती संपूर्ण पारधी समाजासाठी आशेचा किरण आहे. योग्य मार्गदर्शन, प्रशासनाची साथ आणि जिद्द असेल, तर कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही, याचा हा जिवंत पुरावा आहे.
